नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने शहरात सर्वत्र विकास कामे सुरू आहेत. मात्र यासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही शहर भरारी घेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवानंतर खासदार क्रीडा महोत्सवाची संकल्पना मांडली व संपूर्ण शहरात क्रीडा वातावरण निर्मिती केली. यामध्ये भर घालत आयोजित करण्यात आलेली ‘सुराज्य दौड’ ही खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोशिएशनच्या अधिपत्याखाली नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशन आणि स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोशिएशनच्या सहकार्याने सुराज्य दौडचे आयोजन करण्यात आले होते. बोधीसत्व चौक (माटे चौक) येथून सुरू झालेल्या सुराज्य दौडला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, क्रीडा सभापती नागेश सहारे, उपसभापती व स्पर्धेचे आयोजक प्रमोद तभाने, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहते, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक लखन येरावार, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, आंतरराष्ट्रीय ॲथलिट रेशमा पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते अनिल आयनापुरे, इंडियन ऑईलचे नितीन रोडगे, मनिष नांदले, डॉ. पिनाक दंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे राजीव हडप, केतन मोहितकर, विवेक तरासे, टी.आर. नांदले, राष्ट्रपाल वैद्य, नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एल.आर. मालविय, सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, निशीकांत काशीकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.
शहरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी मोठी संधी म्हणून या स्पर्धा महत्वाच्या ठरणा-या आहेत. अशा स्पर्धा खेळाडूंसाठी व्यासपीठ ठरत असून अनेक तळागाळातील खेळाडूंना यापासून प्रोत्साहन मिळत असल्याचेही यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे म्हणाले.
१४, १६ व खुला अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. २१ किमीच्या महिलांच्या खुल्या गटात शहरातील ज्योती चव्हाणने एक तास २७ मिनिट २२ सेकंद अशी वेळ नोंदवून बाजी मारली. मुंबई पोलिस येथे कार्यरत वर्षा भवारी (एक तास २८ मि.४० से.) यांनी दुसरे तर नवमहाराष्ट्र क्लबच्या शितल बारई (एक तास २९ मि. ०३ से.) ने तिसरे स्थान पटकाविले. पुरूषांच्या खुल्या गटातून मध्य रेल्वे नागपूरचा नागराज खुरसुणे एक तास आठ मिनिट ४३ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल ठरला. तर निखील शेंडे (एक तास ११ मि. ५५ से.) व नवमहाराष्ट्र क्लबचा शुभम मेश्राम (एक तास १२ मि. दोन से.) दुस-या व तिस-या स्थानावर राहिला.
१८ वर्षाखालील मुलींच्या गटात ५.७ किमीच्या शर्यतीत जय ॲथलेटिक्स स्पोर्ट्सची प्रियंका हलमारे (२३ मि. २१. से.) सह प्रथम, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाची प्रणाली बुराडे (२४मि.९.से.)ने दुसरे तर नेहरू विद्यालय हिंगणा येथील विधी परिहार (२४मि.२६.से.)ने तिसरे स्थान पटकाविले. मुलांच्या गटात ट्रॅक स्टार क्लबचा शादाब पठाण (१८मि.५४से.) पहिल्या, एकलव्य क्लब काटोलचा ऋषभ तिवसकर (१९मि.१०.से.) दुस-या व जय ॲथलेटिक्सचा रोहित झा (१९मि.२५.से.) तिस-या स्थानावर राहिला.
तीन किमी अंतराच्या मुलींच्या १४ वर्षाखालील गटात ग्रीन सिटीच्या तृप्ती पटले (१८मि.)ने उल्लेखनिय कामगिरीसह पहिले स्थान मिळविले. तर ट्रॅक स्टारच्या श्रेया किरमोरे (१८मि.२५.से.) व अपूर्वा लघुरवार (२०मि.१से.)ने दुस-या व तिस-या स्थानावर बाजी मारली. मुलांच्या गटात नवमहाराष्ट्रचा सर्वज्ञ चामट (१७मि.७से.) पहिला, ग्रीन सिटी स्पोर्ट्स ॲकेडमीचा सोहम धांडे (१७मि.२७से.) दुसरा व ट्रॅक स्टार क्लबचा रूद्र कु-हे (१७मि. ३७से.) तिसरा आला. सर्व विजेत्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, क्रीडा सभापती नागेश सहारे, उपसभापती व स्पर्धेचे आयोजक प्रमोद तभाने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्पुर्वी रूजूल सोनी, शिवानी राणा व रोशनी यांनी झुम्बाच्या डान्समध्ये स्पर्धकांसह उपस्थितांना चांगलेच थिरकायला लावले. कार्यक्रमाचे संचालन विवेक मेंढी यांनी केले.
अधिक वाचा : ‘जनसंवाद’ मधील तक्रारींचा पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा