नागपूर : कळमन्यातील टायर गोदामात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करीत गुन्हेशाखेच्या युनिट तीनने आंतरराज्यीय टायर चोरांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या टायरसह १६ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
मोहम्मद तौसिफ ऊर्फ बाबू मोहम्मद साबिर (वय २६), के. अहमद अकील अहमद (वय ४६), खातिब अहमद रफीक अहमद (वय ४२) व मोहम्मद शाकीर मोहम्मद जुम्मा (वय ३६),अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख बाबू हा आहे.
४ जानेवारीला कळमन्यातील मोहित खुराणा यांचे ट्रक टायर शोरूम व गोदाम फोडून चोरट्यांनी ४१ टायर चोरी केले होते. याप्रकरणी कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलिस आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी,उपनिरीक्षक माधव शिंदे, हेडकॉन्स्टेबल रफिक खान, शैलेश पाटील, विट्ठल नासरे, अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, हरीश बावने व विकास पाठक यांनी या टायर चोरीचा समांतर तपास सुरू केला.
टायर चोरी करून ट्रक भंडारा मार्गाकडे गेल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा पोलिसांनी टोलनाक्यावर सीसीटीव्ही फूटेजही पाहणी केली. ट्रकचा क्रमांक मिळवला. आरटीओत तपासणी केली असता तो मोटरसायकलचा असल्याचे समोर आले. दरम्यान, खवासा येथील आरटीओच्या चेकपोस्टवर ट्रकची संपूर्ण तपासणी होत असल्याने चोरट्यांनी ट्रकला यूपी-२१-बीएन-६००३ या क्रमांची नंबरप्लेट लावली होती. तपासणीनंतर ट्रक उत्तरप्रदेशात गेला. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक खवासा येथे गेले.
चौकशीदरम्यान ट्रकचा क्रमांक पोलिसांना मिळाला. बाबू याच्या मालकीचा ट्रक असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात धडकले. बाबूच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली. बाबूच्या माहितीवरून टोळीतील अन्य सदस्यांना अटक करण्यात आली. या टोळीने पंजाब, बिहार, राजस्थान व कन्नोज येथील टायरचे शोरूम व गोदाम फोडून चोरी केल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील एका चोरीच्या प्रकरणात या टोळीतील सदस्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. काही दिवसांपूर्वीच शिक्षा संपल्याने सदस्य कारागृहातून बाहेर आले होते,असे कळते.
अधिक वाचा : लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून