नागपूर : ‘ओ काट..’ म्हणत विविध रंगांच्या आणि आकाराच्या पतंग उडवून नागपूरकरांनी पतंगोत्सव साजरा केला, तर दुसरीकडे पतंग उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे संपूर्ण शहरात शंभरावर जखमी झाले. यात काहींचा गळा कापला तर काही दुचाकीस्वारांच्या गळ्यात मांजा अडकल्याने अपघात होऊन जखमी झाले.
९ जणांना इजा झाली, यात गळा कापणे आणि गळ्यात मांजा अडकल्याने अपघात होणे आदींचा समावेश आहे.
दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी सर्वच पतंग उडवण्याचा आनंद घेतात. परस्परांची पतंग कापण्याची स्पर्धाही लागते. त्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात येतो. शहरात आज सर्वच भागात पतंग उडवण्याचा उत्साह होता. अनेक ठिकाणी इमारतीच्या छतावर संगीताच्या तालावर पतंग उडवण्यात आल्या. एकीकडे हा उत्साह असताना दुसरीकडे नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनाही घडल्या. वाहन चालवताना गळ्यात मांजा अडकून काही जण जखमी झाले. ही संख्या १०० च्या घरात आहे. नऊ जण मेडिकल, मेयो रुग्णालयांत उपचारासाठी आले. मेयोत आलेल्या चार जणांपैकी एका रुग्णाचा गळा कापला गेला होता.
उर्वरित गळ्यात मांजा अडकल्यामुळे खाली पडल्याने जखमी झाले, तर मेडिकलमध्ये उपचाराला आलेल्या पाचपैकी एकाचा गळा कापला होता. हिंगणा रोडवरून वाडीला जाणारे श्रावण बोबडे (३१) या तरुणाच्याही गळ्यात वाहन चालवताना मांजा अडकल्याने तो जखमी झाला.
पक्ष्यांनाही फटका
मांजाचा पक्ष्यांनाही फटका बसला, मेडिकल परिसरात एक कबूतर मांजामुळे जखमी झाले. रामदासपेठेतील मंगेश बडवाईक यांच्या घराजवळ बॉर्न आऊल प्रजातीचे घुबड एका झाडावरील मांजात अडकलेले होते. त्याची सुटका स्वप्निल बोधाणे, पीयूष आकरे आदी पक्षीप्रेमींनी केली. शालू जैन आणि त्यांची बारा वर्षांची मुलगी सुद्धा नागरिकांना नॉयलॉन मांजा वापरू नका, असे आवाहन करत होती.
अधिक वाचा : नागपुरात कुख्यात चेनस्नॅचर ला अटक