नागपूर : सीताबर्डीतील रेणुकामाता बहुद्देशीय सहकारी नागरी पतसंस्थेतील ग्राहक असलेल्या रिक्षाचालकाच्या नावे तब्बल ५० कोटी व त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा करून बँकिंग हवाला करण्यात आला. त्यानंतर हीच रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतून हाँगकाँगमधील बँकेत विशिष्ट ‘पेमेंट गेटवे’द्वारे वळती करण्यात आली.
मच्छिंद्र खाडे हे १०११ ते २०१३ या कालावधीत पतसंस्थेत कार्यरत होते. या कालावधीत त्यांची मध्य भारतातील सर्वात मोठा हवाला व्यापारी ‘जयेश हवालावाला’ याच्यासोबत ओळख झाली. जयेश हा विदेशातही हवाला करतो. त्यामुळे त्याने खाडे यांच्याशी जवळीक साधली. पतसंस्थेची कार्यालयीन वेळ संपताच जयेश हा खाडे यांना नागपुरातील बड्या हॉटेलमध्ये पार्टी देत होता. त्यानंतर खाडे यांच्या मदतीने संस्थेतील ग्राहक असलेले रिक्षाचालक, ऑटोचालक, कामगार व अन्य ग्राहकांच्या खात्यामध्ये हवालाची मोठी रक्कम जमा करत होता. त्यानंतर ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवस्थापकाच्या मदतीने एका विशिष्ट ‘पेमेंट गेटवे’द्वारे हाँगकाँगमधील बँकेत वळवण्यात येत होती. ही हवाल्याची रक्कम हाँगकाँगमधून विदेशातील एजन्टपर्यंत पोहोचवण्यात येत होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या असलेल्या खातेधारकांच्या खात्यांमार्फत जयेशने आतापर्यंत सुमारे आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम हाँगकाँगमध्ये वळती केल्याची माहिती खास सूत्राने ‘मटा’ला दिली.
‘डायमंड’च्या बहाण्याने हाँगकाँगमध्ये पाठविला पैसा
‘ईडी’ने योगेश्वर डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, मे. श्री चारभुजा डायमंड प्रायव्हेट लिमिटेड व मे. कनिका जेम्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध मनीलॉड्रिंग अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला. अनिल चोखरा, संजय जैन (माजी संचालक रघुकुलल डायमंड्स) व हाँगकाँग येथील मे स्कायलाइट आणि लिंक फै कंपनीचे संचालक सौरभ पंडित यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान खाडे यांच्या मध्यस्थीने बँकिंग हवाला झाल्याचे स्पष्ट होताच ‘ईडी’ने शुक्रवारी त्यांना अटक केली होती. या कंपन्या विदेशात हिऱ्यांची आयात निर्यात करतात. या कंपन्यांच्या संपर्कात असलेला जयेश हा हवालाचा पैसा रेणुकामाता पतसंस्थेतील ग्राहकांच्या नावाचा वापर करून विदेशात पाठवत होता,असेही तपासादरम्यान समोर आले आहे.
लाखावर ५० रुपये कमिशन
हवालाचा पैसा बँकिंग हवालाद्वारे विदेशात पाठवण्यासाठी जयेश याला खाडे याच्यांसह राष्ट्रीयीकृत बँकेचा व्यवस्थापकही मदत करीत होता. हवाल्याची एक लाखाची रोख अन्यत्र पोहोचविण्यासाठी आधी ३०० रुपये द्यावे लागत होते. आता यात वाढ झाली आहे. प्रत्येकी एक लाखामागे आता ५०० रुपये मोजावे लागतात. जयेश याने या कमिशनमध्येही स्वत:चा वाटा ठेवला होता. बँकिंग हवालाद्वारे तो विदेशात व बँकेच्या देशभरातील शाखेमार्फत हवाला करीत होता. यासाठी खाडे यांना लाखामागे ५० रुपये व व्यवस्थापकाला लाखामागे ७५ रुपये कमिशन देत होता. हवालाची रक्कम कोट्यवधीत असल्याने खाडे व व्यवस्थापकाने जयेशसोबत हातमिळवणी केली. या बँकिंग हवालाने खाडे व व्यवस्थापकाने कोट्यवधी रुपयांची माया जमविली.
आयकर विभागाकडून चौकशी
रेणुकामाता पतसंस्थेतील ग्राहकांच्या खात्यातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची आयकर विभागानेही चौकशी सुरू केली आहे. नऊ महिन्यांपासून आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करीत असून, अद्यापही ठोस निष्कर्षापर्यंत न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : नागपुरात पैशाच्या वादातून युवकावर हल्ला