नागपूर – चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात येताच आई व मुलीने चक्क धावत्या रेल्वेतून उडी घेतली. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अजनी रेल्वेस्थानकावर घडली. कल्पना खरवडे (४५) रा. महाल असे मृत आईचे तर रिना खरवडे (२७) असे जखमी मुलीचे नाव आहे.
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्पना यांच्या पुतणीचा पांढुर्णा येथे लग्नसोहळा आहे. त्यात सहभागी होण्यासाठी दोघीही घरून निघाल्या. दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. जीटी एक्स्प्रेसबाबत विचारणा करीत दोघीही गाडीत चढल्या. गाडी दिल्ली मार्गाने जाण्याऐवजी विरुद्ध दिशेला बल्लारशाकडे जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डब्यातील प्रवाशांना विचारणा केली असता चुकीच्या गाडीत बसल्याचे समजले. यामुळे दोघीही घाबरल्या. तेव्हापर्यंत अजनी स्थानक आले होते.
अजनी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून जात असताना गाडीचा वेग काहीसा कमी झाला होता. घाबरलेल्या मायलेकींनी कसलाही विचार न करता एका मागून गाडीतून उडी घेतली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कल्पना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रिना यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.
रिना यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले तर पंचनाम्यानंतर कल्पना यांचा मृतदेहसुद्धा मेडिकलकडे रवाना करण्यात आला. नावे आणि वेळ एकच असल्याने घोळ दोघींना पांढुर्ण्याकडे जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसमध्ये बसायचे होते. ही गाडी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर येते. अगदी त्याच वेळी विरुद्ध दिशेला जाणारी जीटी एक्स्प्रेसही नागपूर स्थानकावर येते. नाव आणि वेळेतील समानतेमुळे मायलेकींना गाडीबाबत योग्य माहिती मिळाली नाही आणि घात झाला.
अधिक वाचा : नागपुरातील गुन्ह्य़ांत घट ; पोलीस आयुक्तांचा दावा