नागपूर : आज देशातील लोकसंख्येचे सरासरी वय २७ वर्ष आहे. या २७ वर्षाच्या लोकसंख्येला शिक्षण व रोजगाराची आवश्यकता आहे. आज एकीकडे रोजगाराची आवश्यकता असणारे तरुण-तरुणी आहेत तर दुसरीकडे उपलब्ध रोजगाराच्या संधी आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र आणून तरुण क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’च्या माध्यमातून रोजगाराच्या प्रतीक्षेतील युवकांना रोजगाराच्या उपलब्ध संधी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. या समीटमुळे खऱ्या अर्थाने युवा सशक्तीकरणाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फॉर्च्यून फाऊंडेशन, नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी नागपूर व इंजिनिअरींग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय पाचव्या ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे शुक्रवारी (ता. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.
सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फॉर्च्यून फाउंडेशनचे संस्थापक आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, माजी खासदार दत्ता मेघे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, फॉर्च्यून फाउंडेशनचे उपाध्यक्ष संदीप जाधव, भाजपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजीव पोद्दार, गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेष कुलकर्णी, युनीयन बँकेचे उपविभागीय महाव्यवस्थापक जी.के. सुधाकर राव, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक विजय कांबळे, सुभाष पारधी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भामध्ये रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. रोजगार निर्मितीसाठी आधी उद्योग निर्माण होणे आवश्यक आहे. बाहेरील उद्योग आपल्या विदर्भात यावेत यासाठी वीज, पाणी, दळवळण ही मुलभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. विदर्भामध्ये वीज, पाणी, दळवळण या सुविधामध्ये वाढ झाली असून येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासावर भर देत विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्य सरकारनेही विविध योजनांद्वारे युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले आहेत. कौशल्य विकासच्या माध्यमातून राज्यात तीन लाख तरूणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले, यापैकी किमान ६० टक्के कौशल्यवान तरुणांना रोजगार मिळाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातूनही राज्यात एक कोटीच्या वर लोकांना रोजगार मिळाले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विदर्भातील उपलब्ध संसाधनांवर आधारीत उद्योग निर्माण व्हावेत : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
देशात बेराजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी केवळ नोकरी हा पर्याय नाही. नोकरीला अनेक मर्यादा असल्याने शहरीसह ग्रामीण भागामध्येही रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. मात्र हे रोजगार निर्माण करताना ग्रामीण व शहरी भागातील युवकांना भटकंती करावी लागू नये. आपल्या विदर्भातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक संसाधनांची देण लाभली आहे. या उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून यावर आधारीत उद्योग येथे निर्माण व्हावेत, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
आज नागपूर व जवळच्या भागात मिहान, बुटीबोरी, मेट्रोमुळे रोजगार उपलब्ध झाले आहेत. विदर्भातील किमान ५० हजार तरुणांना रोजगार मिळावे असा संकल्प केला होता. आतापर्यंत जवळपास २७ हजार तरूणांना विविध मार्गाद्वारे रोजगार उपलब्ध झाले आहेत. पुढील वर्षभरात ५० हजार तरुणांच्या रोजगाराचा संकल्प पूर्ण होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. विदर्भात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देणे व त्यांच्यावर कधीही आत्महत्येची वेळ येऊ नये तसेच आदिवासी भागातील लोकांच्या हाताला काम देणे हा उद्देश आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे महत्त्वाचे आहे. विदर्भात उद्योग येण्यासाठी आवश्यक सुविधा परिपूर्ण आहेत. नवीन कल्पना, संशोधन यांचे रुपांतर उद्योगात करणे व या उद्योगांद्वारे रोजगार उपलब्ध करण्याचे काम सरकारचे आहे. त्यासाठी सरकार सदैव सकारात्मक आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
आजचे छोटे पाऊल राज्यातील तरुणांना प्रगतीची वाट दाखवेल : वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार
रोजगार हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशाची प्रगती करायचे असेल तर येथील तरुणांची क्रयशक्तीचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे. देशातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या आहेत. याशिवाय राज्यातही विविध योजनांद्वारे तरुणांचे सक्षमीकरण केले जात आहे. आज नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे होणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’ हे तरुणांना रोजगाराची वाट दाखविणारे आजचे छोटेसे पाऊल आहे. पुढे हेच पाऊल संपूर्ण राज्यातील तरुणांना प्रगतीची वाट दाखविणारे ठरेल, असे मत यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
तत्पुर्वी फॉर्च्यून फाऊंडेशनचे संस्थापक आमदार प्रा. अनील सोले यांनी प्रास्ताविकाद्वारे ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’ची गत चार वर्षाची वाटचाल विषद केली. ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’ची चार वर्षाची यशोगाथा दर्शविणार्या पुस्तक, सीडी तसेच ग्रीन अर्थची कामगिरी दर्शविणा-या सीडी चे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत स्वयंरोजगारासाठी नागरिकांना बँकांचे धनादेश वितरीत करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांतर्गत बचत गट व इतर लाभार्थ्यांना धनादेश व सिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार संदीप जाधव यांनी मानले.
मतदार नोंदणीसाठी आवाहन
‘युथ एम्पॉवरमेंट समीट’च्या उद्घाटन कार्यक्रमात लोकशाही पंधरवाडा निमित्त लोकशाही बळकटीकरणासाठी युवकांनी पुढे येउन मतदार नोंदणी करावी, यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मतदार नोंदणीसाठी स्टॉलही लावण्यात आले असून येथे १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींची मतदार नोंदणी करण्यात येत आहे. तेथे आकर्षक ‘सेल्फी प्वाईंट’ उभारण्यात आला आहे.
अधिक वाचा : सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात : महापौर नंदा जिचकार