नागपूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांंचे संबंध अतिशय आदर्श मानले जातात. गुरूला विद्यार्थी प्रिय असतो आणि विद्यार्थ्यांसाठी गुरू दैवत असतो. परंतु बदलत्या काळानुसार गुरू-शिष्याची ही व्याख्याही बदलत चालली आहे. याची प्रचिती शुक्रवारी मेकोसाबाग परिसरातील शास्त्री सिंधी हिंदी शाळेतील एका घटनेतून आली. मुलाला मारहाण केल्याचा आरोप करीत पालकांनी शाळेमध्ये तोडफोड करीत शिक्षकालाही मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्धही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन संतोष प्रजापती (१३) हा तिसऱ्या वर्गात शिकतो. गुरुवारी दुपारी शाळेत मुलींचा डंबरेलचा सराव सुरू होता. त्या ठिकाणाहून जात असताना आर्यनने मुलींना धक्का दिल्याचा आरोप आहे. यावेळी राहुल क्षीरसागर या शिक्षकाने आर्यनला हटकले असता तो पळून गेला.
शुक्रवारी सकाळी क्षीरसागर हे वर्गात शिकवत असताना आर्यनचे वडील संतोष प्रजापती काही महिला व पुरुषांना घेऊन शाळेत धडकले. त्यांनी मुलाला का मारले, असा सवाल करीत काही उत्तर देण्याच्यापूर्वीच शाळेत तोडफोड सुरू केली. शिक्षकालाही मारहाण केली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. सर्वाची आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालात मुलाला मारहाण झाल्याचे दिसून आले नाही.
उलट शिक्षकाला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाल्याने क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकांना बेकायदेशीरपणे जमवणे याबाबत गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेण्यात आले. तर संतोष प्रजापतीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी दिली.
अधिक वाचा : पतीसोबत अनैतिक संबंध; मायलेकींची मोलकरीण तरुणीला भररस्त्यावर मारहाण