नागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी‘चे प्रयोग आणखी दोन दिवस वाढविण्यात आले आहेत. नागपूरकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता रविवारपर्यंत नागपूरकरांना महानाट्य बघता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन, पुणेनिर्मित ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी चे प्रयोग २२ डिसेंबरपासून ते २८ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले होते. सर्वांसाठी नि:शुल्क असलेल्या या महानाट्याला नागपूरांनी भरघोस प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे आता २९ आणि ३० डिसेंबर असे दोन दिवस प्रयोग वाढविण्यात आले आहेत.
शिवशंभू शाहीर महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात संभाजींच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आहेत. रवी पटवर्धन औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत. चिन्मय सत्यजित यांनी या नाटकाला संगीत दिले असून, गीत अॅड. महेंद्र महाडिक, दत्तात्रय सोनवणे, रोहित पंडित यांनी लिहिले आहे. महानाट्यासाठी रेशीमबाग मैदानावर १३० फुटांचा भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. ८० फूट लांब व ५५ फूट उंच किल्ल्याची सरकती व फिरती हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
अधिक वाचा : खासदार महोत्सवा’ने नागपूरला दिली नवी सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस