नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि कोशु-कुंग-फू-स्पोर्ट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख सभागृह येथे आयोजित
महापौर चषक कोशु-कुंग-फू कराटे राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन मनपाचे क्रीडा सभापती
नागेश सहारे यांच्या हस्ते झाले.यावेळी नगरसेविका लताताई काटगाये, मनपाचे क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, कोशु-कुंग-फू-स्पोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विनोद राऊत, उपाध्यक्ष बाळासाहेब देसाई, सचिव विजय मदनकर, सुरेश चौधरी, दिलीप अलिये, मनोहर रसाळ, मयूर राऊत, रचना श्रीखंडे, जगदीश पाटील, अजय श्रीखंडे, सतीश शर्मा उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना क्रीडा सभापती नागेश सहारे म्हणाले, शहरात क्रीडाविषयक वातावरण तयार व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. यामुळे नागपुरात खेळविषयक चांगले वातावरण तयार झाले. मनपाच्या माध्यमातूनही अशा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी क्रीडा प्रेमींना देण्यात येत आहे. कराटे स्पर्धेचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नगरसेविका लताताई काटगाये यांनीही स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. असोशिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका विषद करीत तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेची माहिती दिली.
यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी प्रात्यक्षिके करून दाखविली. स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगाना, दिल्ली, तामीळनाडू, आसाम या राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्रिपक्षीय स्पर्धेत कराटे आणि कोशु-कुंग-फूचे विविध प्रकार इव्हेंट आणि काता आणि कुमिते (फायटिंग स्पर्धा) ज्युनिअर, सब ज्युनिअर, सिनियर अशा विविध वयोगटात होणार असून चॅम्पियनकरिता ब्लॅक बेल्ट स्पर्धासुद्धा होईल.