नागपूर : शहरातील घनदाट वस्त्यांमध्ये घडणा-या दुर्घटनांवर अनेकदा त्या ठिकाणी आपल्या अग्निशमन विभागाचे वाहन पोहोचू न शकल्याने आळा घालता येत नाही. परिणामी मोठे नुकसान सहन करावे लागते. शहराची लोकसंख्या वाढत असताना वस्त्याही दाट होत आहेत. अशात अनपेक्षितपणे घडणा-या घटनांसाठी प्रशासन सज्ज असणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पुढाकाराने खरेदी करण्यात आलेल्या २००० लिटर क्षमतेच्या ‘स्मॉल वॉटर फायर टेंडर’ वाहनांमुळे दाट वस्त्यांमधील दुर्घटनांवर आळा घालता येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी विभागामध्ये खरेदी करण्यात आलेल्या २००० लिटर क्षमतेच्या चार स्मॉल वॉटर फायर टेंडर वाहनांचे सोमवारी (ता.१७) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या.
मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निशांत गांधी, मनोज सांगोळे, भगवान मेंढे, नगरसेविका शिल्पा धोटे, वनिता दांडेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, रंजना लाडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, स्टेशन अधिकारी आर.आर. दुबे, सहायक स्टेशन अधिकारी एस.एस. राउत आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार व इतर मान्यवरांनी चारही वाहनांची पूजा करून वाहनांना झेंडी दाखविली. पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, अनपेक्षितपणे येणा-या संकटांमध्ये लोकांचे जीव वाचविणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाकडे आवश्यक सुविधा असणेही गरजेचे आहे. या सुविधांचा समावेश विभागात करण्यात येत असल्याबद्दल आनंद आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका प्रशासन नेहमी तत्पर आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये घनदाट लोकवस्ती व अरूंद रस्ते असल्याने त्या ठिकाणी दुर्घटनेवर कार्य करण्यात अडचण निर्माण होत असते. अशा ठिकाणी कार्य करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने २००० लिटर क्षमतेचे चार नग स्मॉल वाटर फायर टेंडर खरेदी केले आहे. या चारही वाहनांच्या चेसीस खरेदी, फेब्रिकेशन खरेदी व फेब्रिकेशन कार्यावर एकूण १,३७,३३,३८८ रूपये खर्च झालेला आहे.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेस्थानकावर ३३ मिनीटांत मोबाईल चोर अटकेत, आरपीएफ जवानाची कारवाई