नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला अवघ्या ३३ मिनिटांमध्ये पकडले. दीपक शाह (वय २९) या प्रवाशाने पॅसेंजर लौंजमध्ये चार्जिंगला लावलेला सॅमसंग मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आरपीएफ जवान दीपक शर्मा यांच्याकडे सकाळी १० वाजता केली होती.
शाह यांच्या तक्रारीवरून रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. आरोपीने त्याच्याजवळील खराब मोबाईल काही काळ चार्जिंगवर लावला होता. कुणाचेच लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने खराब मोबाईल तेथेच ठेऊन शाह यांचा मोबाईल घेऊन पळ काढल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
आरोपी पुन्हा मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने स्लीपर क्लास वेटिंग रूमच्या बाहेर आढळला. आरपीएफ जवानांनी सकाळी १०.३० वाजता मोबाईल चोरट्यास अटक केली. प्रकाश खांडेकर (वय ५६, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्त करण्यात आले.
अधिक वाचा : नागपुरात अनधिकृत धार्मिक स्थळ हटविणाऱ्या पथकावर नागरिकांची दगडफेक