नागपूर : मनात सकारात्मक भावना असेल तर आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकतो. तणावपूर्ण वातावरणातही जगताना इतरांसाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करुन कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पोलीस जिमखाना येथे रविवारी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा, माय मिरर पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक मनोज अंबिके तसेच ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ पुस्तकाचे लेखक पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजेल असे विचारधन सोप्या शब्दांमध्ये पुस्तकरुपाने उपलब्ध करुन दिले आहे. डॉ.उपाध्याय यांनी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या विविध लेखांच्या संकलनाचे हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून आज या पुस्तकाचे प्रकाशन करताना मनस्वी आनंद होत आहे. या पुस्तकातील कोणताही लेख कोणत्याही पानापासून वाचता येतो. कारण प्रत्येक पान हे कुठलीतरी विचारधारा घेऊन लिहिलेले आहेत.
‘मन जिंकाल तर जग जिंकाल’ हा महत्त्वपूर्ण संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आपले विचार बदलल्यास परिस्थिती आपोआप बदलते. आपल्या मनाची उभारी ही आपली परिस्थिती बदलवित असते. बाह्यशक्तीपेक्षा अंतर्मनाची शक्ती जास्त परिणामकारक आहे. आपल्या अवतीभोवती प्रेरणा देणारे अनेक व्यक्तिमत्व आपण बघत असतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्य केल्यास जीवनात सकारात्मकता वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस विभागात तणावात काम करावे लागते.
रोजची बदलती आव्हाने, जबाबदाऱ्या तसेच जोखीम मोठ्या प्रमाणावार असतात अशा आव्हानात्मक क्षेत्रात काम करीत असताना देखील डॉ.उपाध्याय यांनी मनाची संवेदनशीलता कुठेही कमी होऊ दिली नाही. इतरांनी तसेच पोलीस विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, सकारात्मकता कशी जोपासावी यासाठी ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ पुस्तक वाचावे. या पुस्तकातील विचारधन केवळ अध्यात्मावर आधारित नसून ते विज्ञानाच्या कसोटीवर तावून-सुलाखून वाचकांसमोर ठेवण्यात आले आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हे पुस्तक खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची ‘गुरुकिल्ली’ असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अधिक वाचा : मेट्रो कोचेसची पैकिंग पूर्ण, भारतात रवानगी करता सज्ज