नागपूर : लॉटरी व्यावसायिकाकडे काम करीत असलेल्या एका नोकराने त्याला तब्बल साडे ३४ लाख रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. सिराज रमजान शेख (वय ४६, रा. सोमवारी क्वार्टर) असे या लॉटरी व्यावसायिकाचे तर नसिम मिर्झा बेग (वय ४५,रा. भुतीया दरवाजा) असे या आरोपीचे नाव आहे.
सिराज आणि नसिम यांचे घरगुती सबंध असून तो त्यांच्याकडे कामसुद्धा करीत होता. घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली. सिराज कामानिमीत्त कोलकाता येथे असल्याने त्यांनी नसिम याला फोन करून अवकाश जैन यांचे घरी जावून त्यांचेकडे ठेवलेले ३४ लाख ५२ हजार १०० रुपयांची रोख रक्कम घेवून सिराज यांचा भाऊ फिर्यादीचा मकबूल शेख यांच्याकडे देण्यास सांगितले. नसिमने अवकाश जैन यांच्याकडून पैसे घेतले. परंतु ते फिर्यादीच्या भावाकडे दिले नाही.
सिराजने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांना रेशीमबाग ग्राऊंडच्या गेटसमोर चक्कर आल्याने ते बेशुद्ध झाले. त्यानंतर बॅगमधील रक्कम गायब झाली होती. त्यानंतर नसीम फरार असल्याचे समजते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सिराज यांच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून