नागपूर : नागपुरातील अत्यंत व्हीव्हीआयपींच्या थांबण्याचे ठिकाण असलेल्या रविभवनातील कॅन्टीनमध्ये आज सायंकाळी लागलेल्या आगीत तीन महिला जळाल्या. यातील 60 वर्षीय प्रमिला दिवे गंभीर जखमी असून, त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानिमित्त अत्यंत संवेदनशील रविभवनातील कॅन्टीन संचालकाची दिरंगाईही उघड झाली.
केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री यांच्याशिवाय व्हीव्हीआयपींच्या निवासाची सोय रविभवनात केली जाते. त्यामुळे तेथील सुरक्षाही तेवढीच ताकदीची अपेक्षित आहे. मात्र, येथील कॅन्टीनमध्ये सुरक्षेच्या चिंधड्या उडविल्या जात असल्याचे आज दिसून आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील कॅन्टीनमध्ये प्रमिला दिवे (वय 60), विद्या गायकवाड (वय 40), विजया शिरकर (वय 40) या तिघी जणी गॅसवरील शेगडीवर पोळ्या करीत होत्या. गॅस शेगडी जमिनीवर ठेवण्यात आली होती. पोळ्या करीत असताना गॅस गळती झाल्याने आगीने भडका घेतला. यात पोळ्या टाकणाऱ्या तिघीही आगीच्या कवेत आल्या. मात्र, प्रमिला दिवे यात जास्त भाजल्या. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याने नमूद केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला. तत्काळ आग विझविण्यात आली.
गॅस सिलिंडरचा पाइप जीर्ण झाल्याने त्यातून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे साधा गॅसचा पाइप बदलविण्यातही कॅन्टीन संचालक हयगय करीत असल्याचे स्पष्ट झाले. व्हीव्हीआयपींच्या निवासाचे स्थान असलेल्या रविभवनातही सुरक्षेबाबत हयगय केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : आता महापालिकेचा मालमत्ता कर वसूल करणार खासगी एजन्सी