नागपूर : आसीनगर झोनअंतर्गत आलेल्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर शहरात ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत. प्रभागातील काही कामे निधींमुळे रखडले आहे. ज्या कामांसाठी निधीची आवश्यकता आहे, त्यासंदर्भात आपण स्वत: तातडीने निर्णय घेऊ. सर्व तक्रारींचा पाठपुरावा दर आठ दिवसांनी आपण करणार आहोत. कामे न केल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. सोमवारी (ता.१०) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमांतर्गत आसीनगर झोनमधील नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकत त्यांचे समाधान केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त अभिजीत बांगर, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेविका भावना लोणारे, नेहा निकोसे, भाग्यश्री कानतोडे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, नसीम खान बानो इब्राहिम, वैशाली नारनवरे, नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, परसराम मानवटकर, मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, संदीप सहारे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, आसीनगर झोन सहायक आयुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आसीनगर झोनमधून २४३ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. या सर्व तक्रारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐकून घेतल्या. त्यातील ज्या तक्रारींवर कार्यवाही झालेली आहे त्यावर तक्रारकर्ता समाधानी आहे की नाही, असे तक्रारकर्त्यांना विचारले. ज्या तक्रारींवर तक्रारकर्ता समाधानी नाही, त्यावर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत किती दिवसात तक्रारकर्त्याचे समाधान होईल, त्याचा अवधी विचारत त्या अवधीत समाधान झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करू, असा इशारा दिला.
ज्या कामांसाठी निधी उपलब्ध नाही परंतु ती कामे अत्यावश्यक आहे, अशा कामांच्या निधीकरिता झोनची एक स्वतंत्र माहितीपुस्तिका तयार करावी. त्यासाठी आपण स्वत: विशेष बाब म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवू आणि निधी आणू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
पिवळीनदीच्या संरक्षण भिंती दुरुस्तीसंदर्भातील तक्रारीवर एक प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याव्यतिरिक्त गडरलाईन दुरूस्ती, सिवरेज लाईन, अतिक्रमण, अपंगाना ई-रिक्षा, ग्रीन जीम, उद्यानांचे सौंदर्यीकरण, खेळाचे मैदान, रस्त्याची डागडुजी यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
परिसरात मोकाट जनावरे आणि डुक्करांचा हैदोस प्रचंड वाढलेला आहे, अशी तक्रार मोठ्या प्रमाणावर होती. यावर बोलताना मनपा प्रशासनाने नव्याने निविदा काढाव्यात आणि मनपा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या सहकार्याने ही समस्या सोडविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यासंदर्भात स्वत: पुन्हा झोनमध्ये बैठक घेईल, असेही सांगितले.
आरोग्य विभागासंदर्भात बऱ्याच तक्रारी होत्या. कचरा संकलन केंद्र, कचरा घंटा गाडी नियमित येत नाही, यासंबंधीची तक्रार होती. त्यावर ती समस्या आठ दिवसाच्या आत सोडविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मालकी हक्काचे पट्टे मिळण्यातील अडचण दूर
जनसंवाद कार्यक्रमात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासंदर्भातील काही अर्ज होते. त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार यातील अडचण पूर्णपणे दूर झाली आहे. त्यामुळे नियम व अटीनुसार जे मालकी पट्ट्याचे हकदार आहेत, त्यांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे ते म्हणाले. बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचे घर मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : आता महापालिकेचा मालमत्ता कर वसूल करणार खासगी एजन्सी