नागपूर : शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करून तिचा बालविवाह लावण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडिता कळमन्यातील असून ३० हजार रुपयात तिची विक्री करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुत्रधार महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.
सोनाली प्रल्हाद शाहू आणि स्वप्निल नरेंद्र नंदेश्वर या दोघांवर अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री केली होती. पीडितेला राजस्थानमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंत लोक राहत असून घरकाम करणाऱ्या महिला-मुलींना हजारो रुपये पगार मिळतो, असे सांगत आरोपींनी पीडितेला फसविले. त्यानंतर २६ नोव्हेंबरच्या रात्री आरोपींनी मुलीला राजस्थानमध्ये नेले.
राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर आरोपींनी मुलीला दलालाकडे सुपूर्द करून त्याच्याकडून ३० हजार रुपये घेतले. दरम्यान, पीडितेने मोठ्या बहिणीला फोन करून शेजारी राहणाऱ्या सोनाली आणि तिच्या मित्राने राजस्थानमधील बारा जिल्ह्यात आणून विकल्याचे सांगितले. तसेच आपले लग्न एका मध्यमवयाच्या व्यक्तीशी लावून दिले असून तो रात्रंदिवस आपल्यावर पाशवी अत्याचार करत असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पीडितेच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आरोपींना अटक करून पीडितेला २ दिवसांपूर्वी नागपूरला आणण्यात आले आहे.
अधिक वाचा : ‘ब्लू व्हेल’ सूसाइड गेम : मानसी के मोबाइल की जांच करेंगे फॉरेंसिक लैब और साइबर सेल