नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ दरम्यान लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्यावतीने धरमपेठ झोनअंतर्गत शंकर नगर येथील बास्केटबॉल मैदानात सोमवारी (ता. ३) स्वच्छता व कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, वर्षा ठाकरे, नगरसेवक सुनील हिरणवार, स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छता ॲम्बेसेडर आर.जे. निकेता, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, धरमपेठ झोनचे झोन अधिकारी दीनदयाल टेंभेकर, सिव्हीक ॲक्शन ग्रुपचे विवेक रानडे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे, तेजस्वीनी महिला मंचचे किरण, ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव आदी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान मागील वेळी नागपूर शहराने क्रमवारीत मुसंडी मारली. आता क्रमवारीमध्ये सुधारणा करून बाजी मारण्याचे नागपूर महानगरपालिकेचा उद्देश आहे. यावेळी बोलताना स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी म्हणाले, आपल्या परिसराची, शहराची स्वच्छता राखताना कच-याची योग्य विल्हेवाट लावणे, त्यासाठी त्याचे योग्य विलगीकरण करणे गरजेचे आहे. कच-याची विल्हेवाट लावण्यापुर्वी त्याचे विलगीकरण करणे ही पहिली पायरी आहे. मात्र यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. शहराची स्वच्छता राखताना कच-याच्या समस्येपासून सूटका मिळविण्यासाठी कच-याची योग्य विल्हेवाट आवश्यक आहे. मात्र या सर्व प्रक्रियेची नियमीत देखरेखही आवश्यक आहे, असेही स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी म्हणाले.
यावेळी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे सुरभी जयस्वाल आणि मेहुल कोसुरकर यांनी स्वच्छता ॲप कसे डाऊनलोड करायचे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थित सर्व नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड करावे व इतरांनाही करण्यास सांगावे, असे आवाहन केले.
अधिक वाचा :जागतिक दिव्यांग दिन : फुटाळा परिसरात स्वच्छता अभियान