नागपूर : आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. या मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहून व्हीव्हीपॅटबद्दल माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट नागपूरच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. व्हीव्हीपॅटसह मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी कळमना मार्केट येथील वेअर हाऊसिंग गोडाऊन विंग-सी येथे पोलीस सुरक्षेत कार्यालयीन वेळात सुरू आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या २ लोकसभा मतदार संघात ४ हजार ३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. या सर्व मतदार केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ४ हजार ३३६ बॅलेट युनिट, ५ हजार ४८६ कंट्रोल युनिट व ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट ही नवीन मतदान यंत्रे नागपूरच्या जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) चा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार असून मतदानाच्यावेळी मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडलेले राहील.
मतदार मतदान करताना व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये ७ सेकंदापर्यंत एक पेपरस्लीप डिस्प्ले होईल. त्यानंतर पेपरस्लीप व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये जमा होईल. मतदारांना ही स्लीप सोबत नेता येणार नाही. या स्लीपमध्ये उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, नाव व निवडणूक चिन्ह मुद्रित झाले असेल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडले आहे, याची खात्री मतदार करू शकतो.
अधिक वाचा : मराठा आरक्षण विधेयकाच्या मंजुरीनंतर मनपात सत्तापक्षाचा जल्लोष