जम्मू : जम्मू विद्यापीठातील प्राध्यापकानं क्रांतिकारक भगत सिंग यांना दहशतवादी संबोधल्यानं विद्यापीठात तणाव निर्माण झाला आहे. प्राध्यापकावर विद्यापीठ प्रशासनानं कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा बघता, विद्यापीठानं प्राध्यापकाला निलंबित केलं आहे.
राज्यशास्त्राचे प्राध्यापक तजुद्दिन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते भगत सिंग यांना दहशतवादी संबोधताना दिसत आहेत. त्यांच्या भाषणाचा काही भागच व्हायरल झाला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी प्राध्यापकाविरोधात निदर्शने केली. काही विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे तक्रार केली. प्राध्यापकावर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. भगत सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र, तजुद्दिन त्यांना दहशतवादी संबोधून द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या वादानंतर तजुद्दिन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘त्यावेळच्या परिस्थितीनुसार भगत सिंग यांचे जीवन आणि त्यावेळच्या शासकांच्या हवाल्यानं मी हा संदर्भ दिला होता. भारतीयांसाठी भगत सिंग हे क्रांतिकारी होते, पण त्यावेळच्या शासकांसाठी ते दहशतवादी होते असं मी म्हणालो होतो. पण कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,’ असं तजुद्दिन म्हणाले.
तजुद्दिन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी विद्यार्थ्यांना विरोध मावळला नाही. त्यांनी तजुद्दिन यांना हटवण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, कुलगुरुंनी या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन केली असून, अहवाल मिळेपर्यंत तजुद्दिन यांना निलंबित केले आहे.
और पडे : आरबीआई और मोदी सरकार में मतभेद , १९ नवम्बर को बोर्ड मीटिंग