नागपूर : नागपूर शहरातील कोणताही मुलगा किंवा मुलगी गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, असे नियोजन करा, असे निर्देश देत पालकांनी आवर्जून ही लस आपल्या पाल्याला देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे बुधवारी (ता.२८) रोजी सिव्हील लाईन्समधील भवन्स बी.पी. विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना गोवर-रूबेला लसीकरण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ.संजीव जयस्वाल, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.नरेंद्र बहिरवार, डॉ.सुनील धुरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर, डॉ. साजीद खान, एस. एम.ओ. (डब्ल्यू. एच.ओ.) दीपाली नागरे, रोटरीचे डॉ. राजन, रोटरी ईशान्यचे चारु बाहेती, आनंद कालरा, गौतम बेद, प्रवीण जांभुळकर, कृष्णा कन्नन, मुख्याधापिका अंजु भूतानी, भवन्सचे श्रीमती दत्ता व चमू प्रामुख्याने उपस्थित होते.
गोवर-रूबेला लसीकरण मोहीम महाराष्ट्रात २७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ९ महिन्यांचे बाळ ते १५ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना ही लस देण्यात येत आहे. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
नागपूर शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये, शासकीय व खासगी दवाखाने, अनाथ आश्रम यामध्ये ही लस मोफत देण्यात येणार आहे. बुधवारी भवन्स बी.पी. विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. प्रत्येक पालकांनी शाळा अथवा जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन पाल्यांना ही लस द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. वैद्यकीय सेवेत डॉ. यावलकर, शीतल वांदिले यांनी सहकार्य केले.
अधिक वाचा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा