नागपूर : कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर शहर संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उत्तम प्रकल्पांची देवाणघेवाण होते. कार्लस्रूमधील चांगले प्रकल्प नागपुरात राबविण्यात येईल, असा विश्वास नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू शहरांमध्ये झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘मोबीलाईज युअर सिटी’ या विषयावर मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनएसएससीडीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, मेट्रोचे कार्यकारी संचालक (नियोजन) एस.के. सिंगला, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त राजतिलक रोशन, मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वाहतूक अभियंता आसाराम बोदिले,रजनीश पोरवाल, जीटीचे प्रकल्प संचालक अरुण सेलवरसु, मनपाचे शहर अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
कार्लस्रू शिष्टमंडळात कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न (Mr. Ralf Eichhorn), कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन बुल्ह (Mr. Steffen Buhl), कार्लस्रू अर्बन प्लानिंग डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ. इंग अँक कारमन-वोएस्नर (Ms Prof. Dr.-Ing. Anke Karmann-Woessner), युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायंसेस इंस्टिट्यूट ऑफ ट्राफिक ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रा. डॉ. इंग जान रील (Prof. Dr.-Ing Jan Riel), स्ट्रेटॅजी आर्किटेक्ट ऑलिवर विल (Mr. Oliver Will), कार्लस्रूच्या पुणे इनोव्हेशन कार्यालय प्रमुख श्रीमती इरिस बेकर (Ms. Iris Becker), इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशनचे आशीष पंडित, आशीष वर्मा उपस्थित होते.
प्रारंभी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. नागपुरात सदर प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची व सद्यस्थितीची माहिती दिली. यानंतर कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न (Mr. Ralf Eichhorn) आणि कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन बुल्ह (Mr. Steffen Buhl) यांनी कार्लस्रूच्या अवलंबिलेल्या पद्धतीनुसार शहराचा जो आर्थिक विकास होत आहे, त्याबाबतचे सादरीकरण केले. नागपूर हे भारताचे हृदय तर कार्लस्रू शहर हे युरोपचे हृदय असल्याचा गौरवोल्लेख केला. कार्लस्रू शहरातील नागरी वाहतूक व्यवस्थेवर कार्लस्रू अर्बन प्लानिंग डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ. इंग अँक कारमन-वोएस्नर (Ms Prof. Dr.-Ing. Anke Karmann-Woessner), युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायंसेस इंस्टिट्यूट ऑफ ट्राफिक ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रा. डॉ. इंग जान रील (Prof. Dr.-Ing Jan Riel) यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
कार्लस्रू शहरात आवागमनासाठी सायकलचा उपयोग किती प्रभावीपणे केला जातो, प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी त्याची कशी मदत होत आहे, याबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. ह्या सर्व प्रकल्पांच्या दृष्टीने नागपूर वाटचाल करीत आहे. नागपुरातही याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर नागपूर आशिया खंडातील आदर्श शहर म्हणून गणले जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यानंतर नागपूर शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सुरु असलेल्या विविध प्रकल्पांवर मनपा, महामेट्रो, एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. नागपूर महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित परिवहन सेवेची माहिती दिली. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा नागरिकांनी अधिकाधिक उपयोग करावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शहरात मेट्रोचे संचालन सुरू झाल्यांतर अस्तित्वात येणार असलेल्या ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’चीही त्यांनी माहिती दिली.
परिवहन अभियंता आसाराम बोदिले यांनी नागपूर शहरातील परिवहन व्यवस्थेच्या व्यापक नियोजनावर सादरीकरण केले. महामेट्रोच्या वतीने सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता यांनी बाईक शेअरिंग प्रकल्पावर सादरीकरण केले. कार्लस्रू शहरातील सायकल वाहतुकीचा प्रकल्प नागपुरात यशस्वीपणे कसा राबविता येईल, याचेही विवेचन केले.
सरतेशेवटी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्लस्रूच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. नागपुरात सुरू असलेले प्रकल्प इतर शहरांच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे. येथील नागरिक विकासाच्या प्रत्येक प्रकल्पांकडे सकारात्मक दृष्टीने बघत असल्यानेच हे शक्य होत असल्याचे सांगितले. कार्लस्रू शहराने जे प्रकल्प राबवून जागतिक स्तरावर आपली छाप सोडली, ते प्रकल्प नागपुरात नक्कीच राबविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुरुवारीही सादरीकरण आणि प्रकल्प भेट
गुरुवारचा दिवसही सादरीकरणाचा असणार आहे. नागपूर शहरात सुरू करण्यात येत असलेल्या डिजीटल सेवांसंदर्भात एल ॲण्ड टीच्या वतीने सादरीकरण करण्यात येईल. यानंतर सकाळी ११ वाजता कार्लस्रूचे शिष्टमंडळ मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरला भेट देईल. दुपारी १२ वाजता ‘परवडणारी घरे योजने’ संदर्भात एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे सादरीकरण करतील. शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कार्यशाळेचा समारोप होईल.