नागपूर : उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे एका विचित्र अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. ८० फूट खोल खाणीत ट्रक कोसळल्याने हा अपघात झाला. कृष्णा मडावी असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कृष्णा त्यांचा ट्रक घेऊन सुरगाव परिसरातील दगड खाणीत गेले होते. मात्र, अचानक त्यांचा ट्रक खाणीत सुमारे ६० ते ८० फुटांवरून खाली कोसळला. सुरगाव परिसरातील या खाणीतून मोठ्या दगडांना फोडून बारीक गिट्टी तयार केली जाते. त्याच कामासाठी कृष्णा ट्रक घेऊन सुरगाव खाणीत गेले असावे आणि उंचीचा अंदाज न आल्याने अनियंत्रित झालेला ट्रक खाली कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सुरगाव परिसरात अनेक खाणींमध्ये अवैध उत्खननही सुरू आहे. दगड माफिया त्या भागात सक्रिय आहेत. या घटनेमागे माफियांमधील संघर्ष तर कारणीभूत नाही ना? याचा तपासही पोलिसांना करावा लागणार आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रकच्या कॅबिनमध्ये कृष्णा मडावी यांचा मृतदेह अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी कृष्णा मडावी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून घटनेची चौकशी सुरु केली आहे.
नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननासोबतच गौण खनिजाच्या चोरी संदर्भात अनेक वेळा खुलासे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तर वाळू तस्करांना रोखण्यासाठी गेलेल्या एका तहसीलदाराला आरोपींनी १५ किलोमीटर पर्यंत ट्रकला लटकावून नेल्याची घटना घडली आहे. त्यानंतरही गौण खनिज उत्खनन करून चोरी करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने या तस्करांमध्ये कुणाचीही भीती नसल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा : प्रेमप्रकरणातून १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या