नागपूर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर केलेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जग सुन्न झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. सोबतच मुंबई पोलिसांतील कर्तृत्ववान अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा शहीद झाले होते. या हुतात्म्यांना सलामी देण्यासाठी राज्यभरातील पोलीस स्टेशनमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली. नागपुरमधीलही सर्वच पोलीस स्टेशनमध्ये शहिदांना मानवंदना देण्यात आली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण झाले असले, तरी या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईसह देशाला हादरवून टाकले होते. पाकिस्तानातील दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ पेक्षा अधिक निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. मृतांमध्ये २८ परदेशी नागरिकांचा समावेश होता. अनेक पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा शहीद झाले होते.
मुंबईवर आलेल्या या संकटाला मुंबई पोलिसांनी धैर्याने तोंड दिले. पोलीस जवानांनी ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर तुकाराम ओंबळे यांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन अजमल कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. १० वर्षानंतर आजही या घटनेच्या आठवणीने प्रत्येक नागरिकाच्या अंगावर काटा उभा राहतो. या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळेसारख्या कर्तृत्वान योद्ध्यांच्या प्राणाला देश मुकला होता. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागपुरातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आज आदरांजली अर्पण करण्यात आली.
अधिक वाचा : मेट्रो हाऊस येथून सुशील कुमार यांचे तरुणांना आवाहन : क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हावे