नागपूर : शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८ मीटरपर्यंत रुंदी वाढविण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणात पावणेसात हजार चौरस मीटर खासगी जागा जाणार आहे.
कामठी रोडवर मेट्रो रेल्वेसाठी ट्रॅक तसेच चारपदरी उड्डाणपूल, असा डबल डेकर उड्डाणपूल प्रस्तावित आहे. महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून डबल डेकर उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे. पाटणी ऑटोमोबाईल चौक ते गड्डीगोदाम चौकापर्यंत हा पूल प्रस्तावित आहे. शहर विकास आराखड्यात हा रस्ता ३० मीटरचा प्रस्तावित आहे. तूर्तास हा रस्ता २० मीटर आहे. मात्र, प्रस्तावित ३० मीटर रुंदीतही डबल डेकर उड्डाणपूल शक्य नसल्याने या रस्त्याची रुंदी ३७ मीटरपर्यंत वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे पाठविला आहे.
ऑटोमोबाईल चौक ते गड्डीगोदाम चौकापर्यंत या उड्डाणपुलासाठी ४८०३ चौरस मीटर खासगी जागेचीही गरज महामेट्रो व महामार्ग प्राधिकरणाला आहे. त्यामुळे या जागेचेही अधिग्रहण केले जाणार आहे. या रस्त्याची रुंदी ३७ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी नगररचना विभागाने सभागृहाच्या मान्यतेकरिता प्रस्ताव तयार केला आहे.
याशिवाय वर्धा रोडवरल हॉटेल प्राईड ते सोनेगाव पोलिस स्टेशन व विवेकानंदनगर चौक ते पॉल कॉम्प्लेक्स अजनीपर्यंतचा रस्ताही विकास योजनेत ३० मीटर आहे. येथे डबल डेकर उड्डाणपुलाचे काम सुरू असून साडेसात मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड, दीड मीटर रुंदीचे फूटपाथ प्रस्तावित आहे. त्यामुळे हॉटेल प्राईड ते सोनेगाव पोलिस स्टेशन व विवेकानंदनगर चौक ते पॉल कॉम्प्लेक्सपर्यंत रस्त्याची रुंदी ३८ मीटरपर्यंत वाढविण्याचाही प्रस्ताव नगर विकास विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत मंजुरीसाठी येणार आहे. कामठी तसेच वर्धा रोड रुंदीकरणासाठी एकूण ६ हजार ७८३ चौरस मीटर खासगी जागेचीही गरज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून जमीन अधिग्रहण केले जाणार आहे.
शासनाकडे पाठविणार प्रस्ताव
सभागृहाच्या मान्यतेनंतर शहर विकास आराखड्यात बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी यावर नागरिकांकडून आक्षेप, हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत.
अधिक वाचा : प्लॅन्स कमिटी अंतर्गत ड्रॅगन पॅलेसचा बुद्धीस्ट सर्किटमध्ये समावेश