नागपूर : नागपुरात रविवारी झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले अाहे.
परीक्षा केंद्रात मोबाइल बंदी असताना अश्विनी जनार्दन सरोदे (२३) या परीक्षार्थी तरुणीने चक्क पाण्याच्या बाटलीत लपवून मोबाइल आत नेला व त्याद्वारे प्रश्नपत्रिका फाेडली.
१८ नोव्हेंबरला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेचे एक केंद्र रेशीमबागमधील जामदार हायस्कूलमध्ये होते. अश्विनी हिने परीक्षेचा अर्ज भरला होता. तिने परीक्षा केंद्रात मोबाईलसह प्रवेश केला. प्रश्नपत्रिका हाती येताच तिने त्याचे छायाचित्र मोबाईलद्वारे काढून घेतले व शुभम भास्करराव मुंदाने (२५) च्या व्हॉट्स अॅपवर पाठवले. त्यानंतर त्याने तिला प्रश्नांची उत्तरे पाठवली. यावेळी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना तरुणीचा संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र तपासले व महिला कर्मचाऱ्याकडून तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याजवळ मोबाईल सापडला. तसेच तिने व्हॉट्स अॅपवरून मित्राला प्रश्नपत्रिका पाठवली असून उत्तर विचारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक विनय दत्तात्रय निमगावकर (५१) रा. समर्थ नगरी, सोनेगाव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून अभियंता तरुणीसह तिच्या मित्राला अटक केली आहे. तिचा मित्रही अभियंता असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.
अधिक वाचा : विविध मागण्यांसाठी तरुणांची शहर बसवर दगडफेक