नागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पात कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महा मेट्रोतर्फे वर्धा मार्गावरील उज्वल नगर मेट्रो स्टेशनजवळ सेफ्टी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.
आपातकालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी कोणत्या उपाय योजना करायला हवे याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलच्या माध्यमातून देण्यात आले. आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्यात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावाकरता केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. बचाव प्रक्रियेमध्ये बचाव यंत्राचा व यंत्रणांचा कसा वापर करावा ? अचानक घडलेल्या घटनेला कारणीभूत बाबींचे निरीक्षण करून आवश्यक नोंदी करणे का आवश्यक आहे ? याचे महत्व पटवून देत कार्यस्थळी उद्भवणाऱ्या धोक्यासंबंधी सविस्तर माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
या मॉक ड्रिल अंतर्गत एक कर्मचारी तब्बल ३० फूट पेक्षा ज्यास्त उंचीवर अडकला होता. त्याच्या बचावासाठी नाट्यमय पद्धतीने इतर कर्मचारी धावपळ करत आवश्यक उपकरण गोळा करीत होते. त्यांनतर नियोजित पद्धतीने उंचावर अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्यात आले. यानंतर लगेच त्याला आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे वाचवल्यानंतरच आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करून घटनेतील परिस्थितीवर नियंत्रण आणन्यात आले.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे प्रकल्पांच्या विविध कार्यस्थळांवर मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते. एका मॉक ड्रिलमध्ये किमान २० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत १८० पेक्षा ज्यास्त मॉक ड्रिलचे आयोजन महा मेट्रोतर्फे करण्यात आले असून सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. महा मेट्रोतर्फे वेळोवेळी अश्या प्रकारे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येते. जमिनीच्या एका विशिष्ट उंचीवर रस्सीला धरून काम करणाऱ्या कामगारांपासून मॉक ड्रिलची सुरवात होते.
आंतरराष्ट्रीय मानकानुसार उंचावर काम करतांना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी साधारणतः ३० मिनिटाचा कालावधी लागतो. मात्र, महा मेट्रोने मॉक ड्रिलच्या माध्यमाने केवळ ११ मिनटात कश्याप्रकारे या कर्मचाऱ्यांना वाचवता येऊ शकते हे सिद्ध करून दाखवले. मॉक ड्रिल होत असतांना नागपूर वाहतूक पोलीस विभागांचे अधिकारी होते. वाहतूक अधिकाऱ्यांनी देखील यावेळी काही आवश्यक व महत्वाच्या घटकांची जाणीव उपस्थितांना करून दिली.
अधिक वाचा : हिंगणा मार्गाच्या मेट्रो खांबावर साकारले व्हर्टिकल गार्डन