नागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने येत्या २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत “शिवपुत्र संभाजी” महानाट्याचे प्रयोग नागपुरात आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माजी आमदार मोहन मते यांनी पत्रपरिषदेत दिली.
“स्वराज्यरक्षक संभाजी” फेम अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत. रेशिमबाग मैदानात उभारलेल्या भव्य सेटवर रोज सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत महानाटकाचे प्रयोग होणार आहे. महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणेची निर्मिती असलेल्या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक शिवशंभू शाहीर महेंद्र महाडिक आहेत. विशेष म्हणजे हे महानाट्य नि:शुल्क असून रोज सुमारे ४० हजार लोक एकाच वेळी पाहू शकतील, असे मते यांनी सांगितले.
या महानाट्यात सुमारे २५० कलावंत असून यातील १२५ कलावंत मुंबईचे आहेत. तर उर्वरीत कलावंत स्थानिक आहे. या महानाट्याचा खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून भरून काढण्यात येणार असल्याचे मते म्हणाले. महानाट्यात औरंगजेबाची भूमिका सुप्रसिद्ध कलावंत रवी पटवर्धन यांची असून संगीत चिन्मय सत्यजित यांचे असून गीते अॅड. महेंद्र महाडिक, दत्तात्रेय सोनावणे व रोहित पंडित यांची आहे. या महानाट्याला शालेय व महाविद्यालयीन युवक युवतींनी यावे यासाठी शाळा-महाविद्यालयात जाऊन मुलांना संभाजी महाराजांची माहिती देण्यात येणार असल्याचे मते यांनी सांगितले.
हत्ती, घोडे, उंटांचा वापर
या महानाट्यासाठी १३० फूटांचा भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. ८० फूट लांब व ५५ फूट उंच किल्ल्याची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र राहाणार आहे. प्रथमच १८ फूट जहाजाचा वापर करून संभाजी महाराजांनी दिलेला जंजीऱ्याचा लढा साकारल्या जाणार आहे. संपूर्ण पूर्व विदर्भात या विषयी जागृती करण्यात येणार असून नागपुरात मतदारसंघानुसार नाट्य प्रेमींना आमंत्रित केले जाणार असल्याचे मते यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला संजय खुळे, बिजू पांडे, राजेश छाबरानी, रमण ठवकर, संजय भोसले आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : नागपुर में बच्चों के लिए पहली बार किड्स फेस्टिवल का आयोजन