नागपूर : दिव्यांगांच्या तिसऱ्या दोनदिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी सिव्हिल लाइन्स परिसरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित राहतील.
उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक अनंत विष्णू ढोले, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग सेलचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचचे संयोजक विजय कान्हेकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रकाश गजभिये उपस्थित राहतील.
संमेलनामध्ये हास्य कवी एहसान कुरेशी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या व्यंगात्मक रचना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे संचालित अंध व दिव्यांग ५० कलावंतांच्या ‘स्वरानंदनवन’तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण विशेष आकर्षण राहणार आहे. संमेलनादरम्यान अंध व अपंगांच्या हिताचे १९ ठराव पारित करून शासनाला सादर करण्यात येतील.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘दिव्यांगांचे साहित्य आणि कलाभिरुची’ या विषयावर परिसंवाद, ‘स्वरकथन व कथाकथन’ चर्चासत्र, कवयित्री राधा बोर्डे स्मृती कविसंमेलन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार आहे.
दुसऱ्या दिवशी ‘दिव्यांगासाठी असलेल्या योजना आणि संधी’ यावर मार्गदर्शन, ‘दिव्यांगांचे क्रीडा, साहित्य व सिनेक्षेत्रातील योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. समारोपीय सत्रात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे, आमदार बच्चू कडू, संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले राहणार आहेत.
अधिक वाचा : चंद्रपूर मध्ये वाघाच्या तिसऱ्या बछड्याचाही मृत्यू