नागपूर : हिंगणा मार्गावरील (रिच-३) टि-पॉईंट जवळ मेट्रोच्या दोन पिलरवर साकारण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन हिंगणा मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या ठिकाणी पिलर नं. ११८ व ११९ चारही बाजूने हे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील एयरपोर्ट समोर मेट्रोच्या पिलरवर साकारण्यात आलेल्या व्हर्टिकल गार्डन प्रमाणेच हे व्हर्टिकल गार्डन देखील अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
युफोरबिया, फालफिजिया, यूका, सेन्सीव्हेरा, निरीयम, थूजा, खुफिया आदी प्रकारची शोभिवंत झाडे या पिलरवर लावण्यात आली आहेत. सर्व झाडे आॅक्सिजन देणारी, कमी देखभाल लागणारी आणि नागपूरच्या हवामानारूप तगणारी आहेत. एका पिलरवर साधारणतः अडीच हजार झाडे लावली असून एका झाडाला दिवसाला साधारत: ६० मि.लि. पाणी लागते. झाडांना पुनर्प्रक्रिया केलेले पाणी ठिंबक पद्धतीने देण्यात येते.
उभ्या भिंतीसारखी असणारी बाग म्हणजे व्हर्टिकल गार्डन. या व्हर्टिकल गार्डनला ग्रीन वॉल, लिव्हिंग वॉल, इको वॉल, बायो वॉल, बायो बोर्ड असंही म्हणतात. पिलरपासून एक इंच लांब अंतरावर उन्हापासून बचाव करणाऱ्या आणि न सडणाऱ्या फायबर फे्रम पिलरच्या चारही बाजूला लावण्यात आल्या आहेत. यात लावण्यात आलेल्या फेल्ट (जिओ फॅब्रिक्स) सिस्टीममध्ये शोभिवंत झाडे लावली आहेत. जिओ फॅब्रिक्स अर्थात कापड आर्द्रता धरून ठेवते. त्यामुळे पाण्याची बचत होते. याशिवाय गार्डन तयार झाल्यानंतर पिलरला इजा होत नाही, शिवाय पेंट खराब होत नाही. एका पिलरवर व्हर्टिकल गार्डन तयार करण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागतात.
अधिक वाचा : पब्लिक टॉयलेट दुर्गंध मुक्त करवा रहे गडकरी