नागपूर : मिळेल ती जागा निवारा समजून आणि डोक्यावर आकाशाचे छपर घेउन जीवन जगणा-या बेघरांना मिठाई वाटून नागपूर महानगरपालिकेने दिवाळी साजरी केली. नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा टिमकी भानखेडा, नागपूर येथे सुरू करण्यात आलेल्या बेघर निवारा येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांच्या हस्ते बेघर नागरिकांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती दिव्या धुरडे, अल्ताफ हंसारी, नूतन मोरे, प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार यांच्यासह बेघर निवाराचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
बेघर निवारा येथील सर्व बेघरांकरीता निवारा केंद्र मायेचे आणि विसाव्याचे हक्काचे घर असल्याची प्रांजळ भावना आहे. येथे अनेक बेघर नागरिक निवारा घेत असून या निवाऱ्याच्या माध्यमातून मिळत असलेल्या मायेच्या उबीमुळे त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहून उपस्थितांचेही मन सुखावून गेले.