नागपूर : कार्यालयीन गैरहजेरीची रक्कम माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ) पोलीस महानिरीक्षक कार्यायातील एका रोखपालाला एसीबीच्या पथकाने अटक केली. नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे (वय ३२) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे एएनओ कार्यालय परिसरात गुरुवारी एकच खळबळ निर्माण झाली होती.
एसीबीकडे तक्रार करणारे जयवंतनगर, रामेश्वरी परिसरात राहतात. त्यांच्या आईची किडनी खराब झाल्याने गेल्या वर्षी त्यांनी आईच्या औषधोपचाराच्या निमित्ताने अर्जित रजा घेतली होती. अर्जित रजेची मुदत संपल्यानंतरही त्यांना अपरिहार्य कारणामुळे परत कर्तव्यावर हजर होणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते २२२ दिवस गैरहजर राहिले. त्यातील २६ दिवसांची गैरहजेरी त्यांची परावर्तित रजेत रुपांतरित करण्यात आली. उर्वरित १९७ दिवस त्यांची रजा विनापगारी करण्यात आली. त्यांना तसे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांनी यूओटीसी कॅम्पसमधील विशेष कृती दल कार्यालयातील रोखपाल नंदकिशोर सोनकुसरे यांची भेट घेतली. सोनकुसरे यांनी गैरहजर (तक्रारदार) कर्मचाऱ्याला ३७ हजार रुपये रिकव्हरी निघत असल्याचे सांगितले. ती माफ करायची असेल तर १२ हजारांची लाच द्यावी लागेल, असेही म्हटले.
तक्रारकर्त्याने सरळ एसीबीचे कार्यालय गाठले. तेथे तक्रार नोंदविल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी सोनकुसरे यांच्याशी गुरुवारी संपर्क साधून लाचेची रक्कम एकसाथ देणे शक्य होणार नाही, असे म्हटले. सोनकुसरेने त्यांना दोन टप्प्यात रक्कम मागितली. त्यातील ६ हजारांचा पहिला टप्पा गुरुवारी दुपारी देण्याचे ठरले. तक्रारकर्ते सोनकुसरेंकडे लाचेची रक्कम घेऊन गेले. त्यांनी ती रक्कम स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या एसबीच्या पथकाने सोनकुसरेच्या मुसक्या बांधल्या.
अधिक वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार