नागपूर : जिल्हा सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण अंतर्गत नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ‘कलादालन’ने सादर केलेले सामाजिक विषयावरील नाट्यप्रस्तुतीने राज्यस्तरावर झेप घेतली आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या या नाट्यकृतीतील विद्यार्थी कलावंतांचा सोमवारी (ता. २२) महापौर नंदा जिचकार यांनी गौरव केला.
मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात पार पडलेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका सरीता कावरे, आयेशा उईके, अपर आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यावेळी उपस्थित होते.
‘कुमारावस्था में बच्चों की स्वच्छंद दोस्ती’ ह्या नाट्यप्रस्तुतीला जिल्हास्तरावर आणि विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. जिल्हास्तरावर नागपूर शहरातील खासगी शाळांसह जिल्ह्यातील शाळांचाही सहभाग होता तर विभागीय स्तरावर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, तुमसर आदी ठिकाणच्या चमू सहभागी झाल्या होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या चमूने सादर केलेल्या नाट्यप्रस्तुतीचे लेखन कलादालनच्या उपाध्यक्ष मधु पराड यांनी केले होते. तर दिग्दर्शन कलादालनचे प्रमुख सूर्यकांत मंगरुळकर आणि मधु पराड यांनी केले. निर्मितीसाठी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांच्या मार्गदर्शनात कलादालनच्या उपाध्यक्ष गीता विष्णु, कार्यक्रम समन्वयक संध्या पवार, श्रीमती दिवटे यांचे सहकार्य लाभले. या नाट्यप्रस्तुतीत आंचल गोपाल राव, खुशबू राजेश रेड्डी, लिना लक्ष्मण मेश्राम, किसनलाल भाईलाल उपवैश्य, प्रज्ज्वल कन्हैय्या कोकरडे या कलावंतांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली.
मार्गदर्शक शिक्षकांसह या सर्व कलावंतांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व कलावंतांना प्रमाणपत्र व रोख रक्कम सत्काररूपात देण्यात आली. यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुण दडलेले आहेत. शिक्षक त्यांच्यावर मेहनत घेऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देत आहेत. परिणामी, विभागीय आणि राज्यस्तरावर हे विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. महानगरपालिकेसाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्यातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडा व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.