नागपूर : बक्कळ नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहराच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत.
विनापरवाना पाणी विक्रत्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईला पुढे धजावत नाही. याचाच गैरफायदा हे अवैध पाणी विक्रेते घेत आहेत.
९० टक्के आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे घराबाहेर वा प्रवासात असताना प्रत्येक जण शुद्ध पाण्याच्या शोधात असतो. त्यासाठी बाटलीमागे २० ते ३० रुपये मोजत असतो, परंतु पैसे मोजूनही त्याला अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे.
उपराजधानीत अनेक ठिकाणी बाटलीबंद आणि कॅनमधून पिण्याचे पाणी पुरवणारी प्रतिष्ठाने गल्लोगल्ली सुरू झाली आहेत. शहरात जवळपास ६० नोंदणीकृत तर शंभरहून अधिक विनापरवाना पाणी विक्रेते आहेत. या व्यवसायात मिळणाऱ्या प्रचंड नफ्यामुळे अनधिकृत कंपन्यांची संख्या दरोज वाढत आहे. सरासरी वीस रुपये प्रतिबाटली दराने पाणी विकणाऱ्या या कंपन्या एक बाटली पाण्यामागे केवळ एक ते दोन रुपये खर्च करतात. २० लिटरची पाण्याची कॅन ७० रुपयात विकत असून त्यामागे ५० रुपयांचा थेट नफा ते कमावतात. शिवाय एक लिटर पाण्याच्या बाटलीच्या प्लास्टिकची तपासणी होत नसल्याने पाण्याच्या शुद्धतेवरही प्रश्न कायम आहे. या पाण्याची तपासणी नियमित होत नसल्याने हे पाणी जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक वाचा : राममंदिरासाठी मोदी सरकारनं कायदा करावा! – मोहन भागवत