नागपूर : एक कोटी रुपयांसाठी एका सोळा वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या तीन सदस्यांना पोलिसांनी जेरबंद केले असून अपहत मुलाची सुखरूप सुटका केली.
प्रथमेश ऊर्फ दत्ता संजय गोरले (२०) रा. गोपाळ विहार, इंदिरानगर, खळगाव रोड, वाडी, नारायण सुंदरलाल पवार (३६) रा. दुनाव तारा. मुलताई, जि. बैतुल (मध्यप्रदेश) आणि दिनेश मोतीराम बारस्कर (३९) रा. टिकारी, बैतुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर गौरव सूर्यवंशी हा फरार असून शिव ऊर्फ प्रिंस चंद्रन हा आरोपी मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. हर्षित संतोष पाल (१७) रा. संतोषीनगर, महादेवनगर, लावा, वाडी याचे २ ऑक्टोबरच्या सायंकाळी अपहरण करण्यात आले होते. हर्षितचे वडील वाहतूक व्यावसायिक आहे. हर्षितचे अपहरण केल्यास पैसा मिळू शकेल, याची आरोपींना कल्पना होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दत्ता हा इतर आरोपींच्या मदतीने अपहरणची योजना आखत होता. त्यासाठी त्यांने कारही चोरली. दत्ता हा हर्षितला ओळखत होता.
२ ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याला लावा परिसरातील एका किराणा दुकान परिसरात त्याला भेटायला बोलावले व अविनाश गजभिये याचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर नागपूरबाहेर नरखेड येथे नेऊन त्याचे हातपाय बांधले व तोंडाला पट्टी लावली. त्यानंतर इतर आरोपी त्याला मध्यप्रदेशात घेऊन गेले. त्याच रात्री आरोपींनी हर्षितचे वडील संतोष पाल (४३) यांना भ्रमणध्वनी करून मुलाचे अपहरणाची माहिती दिली व एक कोटी रुपये खंडणी मागितली. दुसऱ्या दिवशी भ्रमणध्वनी करून पैसे कुठे पोहोचवायचे हे सांगण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची वाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस चौकशीत हर्षित हा दत्ता व श्रेयश ऊर्फ बिट्ट संदीप उईके यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. दत्ता हा बेपत्ता होता, तर बिट्टने दत्ता व त्याच्या मित्रांनी हर्षितचे अपहरण केल्याची माहिती दिली. आरोपींनी खंडणी मागताच वाडी व गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा टॉवर लोकेशन घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले.
दरम्यान, प्रिंन्स हा दिल्लीचा रहिवासी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे खून, खुनाचा प्रयत्न व दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजले. पोलिसांनी ताबडतोब त्याचा शोध सुरू केल्यावर तो फरार असल्याचे आढळून आले. मध्यप्रदेश पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. नाकाबंदीदरम्यान मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला पकडले. मात्र, उर्वरित आरोपी व हर्षित हे सापडले नाहीत. ते वारंवार भोपाळ, झांशी, ग्वाल्हेर, आग्रा असे फिरत होते. प्रथम त्यांनी पैसे भोपाळला मागितले व नंतर आग्राला पोहोचवण्यास सांगितले.
अधिक वाचा : एक कोटीसाठी तरुणाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद