फेसबुकला टक्कर देण्यासाठी सुरू केलेली सोशल नेटवर्किंग साइट ‘गुगल प्लस’ अत्यल्प प्रतिसादामुळे बंद करत असल्याची घोषणा गुगलने केली आहे. या साइटवरून लोकांचा गोपनीय डेटा चोरीला जात असल्यामुळे गुगलने हा निर्णय घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे.
फेसबुकचा वाढता प्रतिसाद पाहता २०११मध्ये गुगलनेही सोशल नेटवर्किंग साइट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २८ जून २०११ला गुगल प्लस ही वेबसाइट सुरू करण्यात आली. या वेबसाइटला फेसबुकच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तरीसुद्धा ही साइट ७ वर्ष सुरू होती. पण यंदा मार्चमध्ये या वेबसाइटवरून ५ लाख लोकांचा गोपनीय डेटा चोरीला गेल्याचं गुगलच्या निर्दशनास आलं.
२०१५ पासून ही डेटा चोरी बेमालूमपणे सुरू होती. त्यानंतर गुगलचं सायबर सुरक्षा पथक कामाला लागलं. काही दिवसांपूर्वी सायबर सुरक्षा पथकाने आपलं कार्य चोख केलं असून आता गुगल प्लसवरचा डेटा सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण गुगलने दिलं. पण नक्की डेटा कशामुळे चोरीला जात होता, या डेटा चोरीमागे कोणत्या संस्थेचा हात होता याबाबत मात्र गुगलने काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. यामुळे गुगल प्लस खरोखरच सुरक्षित आहे का हा प्रश्न अनेक सायबर तज्ज्ञांनी विचारला. या सगळ्या प्रकरणाला पूर्णविराम देण्यासाठी आता गुगल प्लस बंद करण्याची घोषणा गुगलने केली आहे. गुगल प्लसवरून होणारी डेटा चोरी थांबवू न शकल्यामुळेच गुगलने हा निर्णय घेतल्याची सायबर वर्तुळात चर्चा आहे.
अधिक वाचा : वोडाफोन ने दिया 4 महीने के लिये फ्री इंटरनेट