नागपूर : उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘वर्ल्डक्लास मेकओव्हर’ करण्याची बहुप्रतीक्षित निविदा येत्या शुक्रवारी उघडली जाणार आहे. १७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणाऱ्या पाचपैकी एका कंपनीची निवड होण्याची शक्यता आहे.
मिहान प्रकल्पाला बळ देणाऱ्या विमानतळाच्या विकासाचा मुद्दा गेल्या दीड दशकापासून रेंगाळला. नवीन सरकार आल्यानंतरही चार-साडे चार वर्षे लागली. विमानतळासाठी २८ महिन्यांपूर्वी निविदा बोलावल्यानंतर पाच कंपन्या पात्र ठरल्या. त्यालाही वर्ष-दीड वर्षाचा काळ लोटला. यापूर्वी दोनवेळा कालमर्यादा वाढवल्यानंतर शुक्रवारी आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहे. त्यातील पात्र कंपनीकडे काम जाईल.
मिहान इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विमानतळ विकासासाठी निवड झालेली संबंधित कंपनी आणि एमआयएल यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येईल. यात संबंधित कंपनीचे ७४ टक्के आणि एमआयएलचे २६ टक्के भागिदारी राहील. प्रकल्पाची किंमत १६८५ कोटी रुपये आहे. विमानतळाच्या विकासासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा प्रोजेक्ट्स, एस्सेल इन्फ्रा आणि पीएनसी इन्फ्रा या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. शुक्रवारी दुपारी निविदा उघडल्यानंतर कोणत्या कंपनीची निवड झाली हे लगेच स्पष्ट होईल.
मिहान प्रकल्पासाठी विमानतळ हस्तांतरणास विमानतळ प्राधिकरणाने प्रदीर्घ काळ लावला. त्यास आता दशक लोटले. केंद्रातील भाजप सरकारला साडे चार वर्षे तर, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला चार वर्षे होत आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर मिहानसारख्या अनेक प्रकल्पांच्या कामांना आता वेग देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
नवीन टर्मिनल इमारत, टॅक्सी-वे, अॅप्रोच रोड, पार्किंग आणि प्रवाशांना आवश्यक सर्व सोयी पहिल्या चार वर्षांत उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे. तसेच, या काळात विमानतळावर दरवर्षी ४० लाख प्रवासी हाताळणारी क्षमता निर्माण करण्यात येईल. प्रवाशांची संख्या ८० टक्केपर्यंत पोहोचताच आणखी २० लाख प्रवाशांच्यादृष्टीने विस्तार करण्यात येईल. सद्यस्थितीत ५ ते ७ हजार टन कार्गो असून ४ वर्षांत २० हजार टनच्यादृष्टीने क्षमता निर्माण करण्यात येईल. त्यानुसार विमानतळाच ‘मेकओव्हर’ होईल. नवीन कंपनीला विमानतळ हस्तांतरित झाल्यापासून ८ वर्षांनी दुसरी धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे दुसऱ्या धावपट्टीचा वाद लगेच उद्भवण्याची शक्यता कमी आहे.
अधिक वाचा : विदर्भाला औद्योगिक विकासात अग्रेसर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस