दुबई : आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये मंगळवारी भारताचा सलामीचा सामना दुबळ्या हाँगकाँगशी होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्याची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत उतरला आहे. भारतीय संघ हाँगकाँगला कमी लेखणार नसून मंगळवारच्या सामन्यात भारताकडून विशेषत: मधल्या फळीबाबत प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव, यो-यो चाचणीत उत्तीर्ण होऊन संघात पुनरागमन करणारा अम्बटी रायुडू, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक यांच्यामध्ये मधल्या फळीतील स्थान भक्कम करण्यासाठी चुरस आहे. त्याचप्रमाणे, लोकेश राहुलला तिसरा सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले असले, तरी त्यालाही मधल्या फळीत संधी मिळू शकते. गोलंदाजीच्या आघाडीवर भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह यांच्यासह नवोदित खलील अहमद व शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीही भारतीय संघाला हाँगकाँगविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. दुबईमध्ये सध्या ४३ अंश सेल्सियस इतके तापमान असून, दिवस-रात्र सामन्यामध्ये दोन्ही डावांदरम्यान वातावरणात होणाऱ्या बदलांशी भारतीय संघाला जुळवून घ्यावे लागेल.
दुसरीकडे हाँगकाँगचा बहुदा या स्पर्धेतील हा अखेरचा सामना असेल. हाँगकाँग संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) वन-डे मान्यता नसली, तरी संयुक्त अरब आमिरातला (यूएई) पराभूत करून हाँगकाँगने आशिया कप स्पर्धेत प्रवेश मिळवला. सलामीच्या सामन्यात हाँगकाँगला पाकिस्तानकडून आठ विकेटनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात हाँगकाँगचा संघ ११६ धावांमध्ये गारद झाला होता. भारताविरुद्ध हाँगकाँगच्या विजयाची शक्यता धुसर असली, तरी सलामीच्या सामन्यापेक्षा कामगिरी उंचावण्यासाठी हाँगकाँगचा संघ प्रयत्न करेल.
संघ – भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अम्बटी रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक, खलील अहमद.
हाँगकाँग : अंशुमन रथ (कर्णधार), एजाज खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकॉलसन, ख्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाझ, अर्शद महंमद, किंचित शाह, नदीम अहमद, राग कपूर, स्कॉट मॅकेहनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसैन.
अधिक वाचा : राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार के लिए विराट कोहली और वेटलिफ्टर चानू के नाम की सिफारिश