नागपुर : उपराजधानित जुन्या वादातून गुंडाची हत्या झाल्याची घटना आज (सोमवारी) घडली. राम धुरिया असे मृत गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. गुन्ह्याची राजधानी झालेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारी नियंत्रित करणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र तयार झाले आहे. दर-दिवसाला हत्या, लुटमार आणि मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. यामुळे नागपुरातील गुंडांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहे.
शनिवारी रात्री उशिरा नागपूरच्या सेंट्रल एवेन्यू मार्गावरील गीतांजली चौकात जुन्या वैमनस्यातून राम धुरिया नामक गुंडावर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर आरोपींनी तेथून पळ काढला. जखमी राम धुरियाला पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आनंद कुरील, अक्षय निमजे आणि टोनी पौनीकर विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून या तिघांना अटक केली आहे. मृत राम हा सराईत गुंड असून त्याच्यावर एमपीडीए आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
अधिक वाचा : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर अपहरण करून गँगरेप