नागपूर : औद्योगिक क्षेत्रात मागास असलेल्या भागांच्या समतोल विकासाला प्राधान्य देण्यासाठी नवीन औद्योगिक धोरणात विदर्भाचे औद्योगिक क्षेत्रातील मागासलेपण दूर करुन आवश्यक सुविधा व सवलती देऊन विदर्भालाऔद्योगिक विकासात अग्रेसर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करताना मराठवाडा व विदर्भासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पाईंट येथे ‘व्हीआयए’चा 55 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्हीआय सोलर उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर, खासदार कृपाल तुमाने, डॉ.विकास महात्मे, आमदार डॉ.आशिष देशमुख, लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सोलर ग्रुप कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्हीआयएचे सचिव डॉ.सुहास गोधे आदी उपस्थित होते.
उद्योग विकासामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होत असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून औद्योगिक क्षेत्रात समतोल विकास करताना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धोरण तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
नागपूरसह विदर्भाच्या औद्योगिक विकासासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्तीसगडपेक्षा कमी वीजदर असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, विदर्भ व मराठवाड्यातील वीजदराबाबतची मुदत लवकरच संपत असून ती मुदत पाच वर्षे वाढविण्यात येईल. अमरावतीसारख्या दुर्लक्षित औद्योगिक वसाहतीत मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु झाले असून 23 मेगा प्रोजेक्ट सुरु होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे जेएनपीटी बंदराला जोडणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरु होत असल्यामुळे लॉजिस्टिक उद्योगांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आणि त्यादृष्टीने उद्योजकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टेक्स्टाईल्स धोरणासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेण्यात येऊन विदर्भ व मराठवाड्यासारख्या कापूस उत्पादन करणाऱ्या क्षेत्रातच उद्योग सुरु ठेवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे याला प्राधान्य राहणार आहे. त्यासोबतच नवीन औद्योगिक धोरणात उद्योगांच्या विकासाला व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन उत्कृष्ट उद्योजक म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या उद्योजकांना विदर्भ गौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तीन दशकापेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करुन नावलौकिक मिळविल्याबद्दल दिनशॉ डेअरी फूड प्रा. लि. चे चेअरमन आस्पी दिनशॉ बापूंना व व्यवस्थापकीय संचालक जिमी राणा यांना जीवनगौरव हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अधिक वाचा : गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टाक्यांची संख्या वाढवा : वीरेंद्र कुकरेजा