१८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११वा दिवस भारतासाठी आनंददायी ठरला. भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे आज भारताच्या यादीत दोन सुवर्ण पदकांची भर पडली आहे. आज अरपिंदर सिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात पहिले सुवर्ण पदक जिंकले. यानंतर महिलांच्या हेप्टॅथ्लॉन प्रकारात स्वप्ना बर्मन हिने भारताला ११वे सुवर्ण पदक मिळवून दिले.
पंजाबच्या अमृतसरचा रहिवासी असलेल्या अरपिंदरने आपल्या तिसऱ्या प्रयत्नांत मारलेल्या उडीच्या बळावर (१६.७७ मीटर) सुवर्ण पटकावले. उझबेकिस्तानच्या रसलान कुरबानोव्ह (१६.६२ मीटर) रौप्य, तर चीनच्या शुओ काओने (१६.५६ मीटर) कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.
आज (बुधवार) जकार्तामध्ये अरपिंदरने भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील १०वे आणि त्यानंतर स्वप्नाने ११वे सुवर्ण पदक मिळवले. भारताचा खेळाडू सुरेश बाबू हा सहाव्या स्थानी होता. भारताने आशियाई स्पर्धेतील तिहेरी उडीत ४८ वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावले आहे. यापूर्वी महिंदर सिंग याने सन १९७० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.
अरपिंदर सिंगची पहिली उडी अयशस्वी ठरली. यानंतर त्याने दुसऱ्या उडीत १६.५८ मीटरचे अंतर कापले. त्याची तिसरी उडी मात्र १६.७७ मीटरची होती. अरपिंदरची चौथी उडी १६.०८ मीटरची होती. त्याची पाचवी आणि सहावी उडी अयशस्वी ठरली. स्पर्धेत बराच काळ सुरेश बाबू दुसऱ्या स्थानावर होता, मात्र नंतर तो मागे पडत गेला.
या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताकडील सुवर्ण पदकांची संख्या ५वर पोहोचली आहे. यापूर्वी नीरज चोप्राने भालाफेकीत, तजिंदरपाल सिंग तूरने शॉटपूट आणि मनजीत सिंगने ८०० मीरच्या धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले आहे.
अधिक वाचा : Asian Games 2018: Sharath Kamal and Manika Batra win a bronze in table tennis mixed doubles