नागपूर, ता.२८: नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांची झोननिहाय आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी दिली. मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी समिती उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या नसीम खान बानो मोहम्मद इब्राहिम, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, उपायुक्त रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.सुनील धुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कोणतिही व्याधी होता कामा नये.यासाठी त्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. हे शिबिर समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली. महानगरपालिकेमध्ये सध्यस्थित अंदाजे ७८३५ सफाई कर्मचारी काम करत आहे. त्यांची झोननिहाय आरोग्य तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक झोनमधील महापालिकेच्या मोठ्या दवाखान्यांमध्ये ही तपासणी शिबिरं आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या आयोजनामध्ये समाजकल्याण विभाग व्यवस्थापन व संगणीकृत नोंदणी करणार आहे. यामध्ये वैद्यकीय विभागाद्वारे औषधे,वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्स यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये क्षय रोग व कर्करोग तपासणारे तज्ज्ञ डॉक्टर्सही येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिझल्स रूबेला लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. ही लस वय वर्षे ९ ते १५ या वयोगटातील मुलामुलींना देणे बंधनकारक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.सुनील धुरडे यांनी दिली. या मोहिमेसाठी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारे महिला बचत गट, सामाजिक संस्था यांची मदत घेण्याचे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी दिले.
याबैठकीमध्ये महिलांना काचबटन शिवणयंत्र देण्याकरिता समाजकल्याण विभागाला प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांची यादीला सभापती प्रगती पाटील यांनी मान्यता दिली. झोननिहाय कच-यांचे संकलन केंद्र सुरू करण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. महिला बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन संकलन केंद्र सुरू करण्याबाबात विचार करण्यात यावा, असेही सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा : नागपुरात स्क्रब टायफस ने घेतले ५ बळी