नागपूर : आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर वसुलीसाठी धावपळ करण्यापेक्षा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न करायला हवे. म्हणूनच यंदा करवसुलीचे त्रैमासिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ३० सप्टेंबरला अर्धवार्षिक उद्दिष्ट सर्व कर निरीक्षक व कर संग्राहकांनी पूर्ण करावे असे निर्देश देत यात कुठलीही दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिला.
कर वसुलीचा झोननिहाय आढावा घेण्यासाठी धरमपेठ झोनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.
यावेळी सभापती संदीप जाधव आणि उपसभापती सुनील अग्रवाल यांनी धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या वॉर्डातील करवसुली आणि थकबाकी वसुलीचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. काही कर निरीक्षक आणि कर संग्राहकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ३० सप्टेंबरपर्यंत अर्धवार्षिक उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर कारवाईचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असा इशारा सभापती संदीप जाधव यांनी दिला. ते म्हणाले, धरमपेठ झोन हा मालमत्ता कर वसुलीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहतो. हे केवळ कर निरीक्षक आणि कर संग्राहकांमुळे शक्य होते. मात्र, यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. यालाही जबाबदार कर निरीक्षक आणि कर संग्राहक आहेत. या झोनअंतर्गत असलेले मालमत्ताधारक कर भरण्यास तयार असतात. मात्र, आपण त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. थकबाकी पूर्णपणे निरंक करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. धरमपेठ झोनमधील काही वॉर्ड हे साध्य करू शकतात. धरमपेठ झोनने हे साध्य केले तर ते इतर झोनसाठी उदाहरण आणि आदर्श ठरेल. त्यादृष्टीने यापुढील कार्य करा आणि ३० सप्टेंबरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश्र श्री. जाधव यांनी दिले.
उपसभापती सुनील अग्रवाल यांनी कर वसुलीच्या बाबतीत संबंधित प्रभागातील नगरसेवकांची मदत घेण्याचे सुचविले. ज्यांनी वर्षोनुवर्षे कर भरला नाही किंवा जे कुचराई करीत आहेत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करा, असेही ते म्हणाले.
सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनीही कर निरीक्षक आणि कर संग्राहकांना कठोर कार्य करण्याच्या सूचना केल्या. यापुढे प्रशासन कुठलीही हयगय करणार नाही. ज्याचे कार्य चांगले त्यांना अवॉर्ड आणि ज्यांचे कार्य समाधानकारक राहणार नाही त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनीही झोनमधील कर निरीक्षक आणि कर संग्राहकांच्या कार्यावर नाराजी व्यक्त करीत कर वसुलीत नियम आणि कायद्यानुसार कार्य करण्याचे सांगितले. बैठकीला झोनमधील सर्व कर निरीक्षक आणि कर संग्राहक उपस्थित होते.