नागपूर : बनावट इनव्हाईसच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोधमोहिम सुरू केली आहे. त्या अंतर्गत केंद्रीय जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी ६२१.६० कोटींच्या बनावट व्यवहारात शुक्रवारी चार जणांना अटक केली आहे.
अधिकृत व्यक्तींच्या चौकशीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील चार करदाते कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट इनव्हाईस देणे आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध करून देण्यात गुंतल्याचे समोर आले. या करदात्यांनी स्वत:ला कमिशन एजंट म्हणून घोषित केले होते. विभागाला त्यांच्या कार्याविषयी संशय उद्भवला. या करदात्यांनी खोट्या कंपनीद्वारे काम करताना केवळ कागदावर मोठ्या प्रमाणात व्यवहार दाखवले होते. ते महाराष्ट्रातील दुर्गम भागात असून त्या ठिकाणी कोणतेही मोठे औद्योगिक हब नाहीत. शिवाय परिसरात रेल्वे आणि रस्त्याच्या जोडणीचे जाळे नाहीत.
धाडीदरम्यान या करदात्यांनी घोषित केलेल्या व्यवसायाची ठिकाणे निवासी आवारात असल्याचे दिसून आले. शिवाय कोणतेही व्यावसायिक उपक्रम नसलेले आणि फसवी कागदपत्रे पत्त्यांचा पुरावा म्हणून जीएसटीएनवर अपलोड केल्याचे आढळले. या करदात्यांनी ६२१.६० कोटी किमतीचे बनावट व्यवहार केल्याचे निदर्शनास आले. कोणतीही वस्तू किंवा सेवा न देता या खोट्या व्यवहारात बनावट पावत्यांच्या आधारावर त्यांनी ३१.०८ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले.
या कंपन्यांच्या चारही संचालकांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीत त्यांच्या बनावट व्यवहाराची माहिती मिळण्याची अपेक्षा असल्याचे डीजीजीआय नागपूर झोनल युनिटचे अतिरिक्त संचालक प्रदीप गुरुमूर्ती यांनी व्यक्त केली आहे.