नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा तुटवडा भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्क निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५७ बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत ३६ हजाराच्यावर मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. सदर मास्क हे माफक दरात उपलब्ध करून दिले जात असून योग्य रितीने स्वच्छ करून पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे आहेत. याद्वारे महिला बचत गटाला रोजगारही उपलब्ध होत असून जनतेसाठी माफक दरात व उच्च गुणवत्तेचे मास्क उपलब्ध होत आहेत.
कोरोना करीता उमेद अभियान
उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचत गटातील महिला ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण व स्वच्छता समितीमार्फत गावामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये हातभार लावत आहेत. त्याबरोबरच मास्कची निर्मिती करून कोरोनाविरोधातील शस्त्र जनतेला उपलब्ध करून देत आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. उमेद अभियानातील बचत गटांना मास्क तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती मार्फत देण्यात आलेले आहे.
यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बचत गट महिला मास्क तयार करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये यांच्याकडून बचत गटांनी तयार केलेल्या मास्कची खरेदी करण्यात येत आहे. पंचायत समिती चिखलदरामार्फत रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी मास्क वाटप करण्यासाठी बचत गटांकडे मागणी करण्यात आली आहे.
तसेच ग्रामपंचायत १४व्या वित्त आयोगातील अनुदानातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत बचत गटांकडून मास्कची खरेदी करत आहेत. गटातील महिला देखील गावातील नागरिकांना मास्क वापरण्यासाठी प्रेरित करीत आहे. विविध गावातील ग्रामसंघाद्वारे सुध्दा गरजूंना मोफत मास्कचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत बचत गटातील महिलांनी ३६ हजारांच्या वर मास्क तयार केले असून यामधून ४ लक्ष ८० हजारची विक्री करण्यात आली आहे.
कोरोना विरोधातील लढाईत सहभागाचे समाधान
मेळघाटातील चिखलदरा येथील उमेदच्या अध्यक्षा मंगला बारस्कर यांनी सांगितले की, स्वयं सहायता समूहातील महिलांच्या सहकार्याने आतापर्यंत तीन हजार १०० मास्कची विक्री केली आहे. शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, तसेच ग्रामस्थांकडून स्वयंसहायता समूह निर्मित मास्कला चांगली मागणी आहे. यातून रोजगार उपलब्ध झालेला आहे, तसेच लोकांच्या आरोग्य संरक्षणाचे कामही करता येत असल्याने करोना विरोधातील लढाईमध्ये समाविष्ट झाल्याचे समाधान मिळत आहे.