नागपूर : रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघाताची संख्या कमी होईल. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात ‘रस्ते वाहतूक’ हा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे व्यक्त केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूरच्यावतीने गिरीपेठ येथील आरटीओ कार्यालयात सोमवारी ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. उपाध्याय बोलत होते. व्यासपीठावर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन, जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार उपस्थित होते.
२०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये आठ टक्के अपघात कमी झाले आहेत. २०१९ मध्ये १० टक्के अपघात कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती देत पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणाले, रस्त्यावर कुणालाच माफी नाही. देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. म्हणूनच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. शहरात दुचाकी व तीनचाकीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. यामुळे याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमात जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांवर पथनाट्य सादर केले. यावेळी रस्ता सुरक्षतेवर उल्लेखनीय कार्य करणाºया जनआक्रोशचे अध्यक्ष रवींद्र कासखेडीकर व चमूचे, सामाजिक कार्यकर्ता संजय गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.
अधिक वाचा : धरमपेठ झोनमध्ये जनसंवाद : १५०च्या वर तक्रारींचा निपटारा