नागपूर : गोमांसाच्या तस्करीप्रकरणी नागपूर पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून यामध्ये 3 चिनी नागरिकांचा समावेश आहे. नागपूर पोलिसांनी 18 जानेवारीला केलेल्या कारवाईमध्ये 8 ते 10 किलो गोमांस पकडले होते. या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चिनी नागरिकांचा गोमांस तस्करीमध्ये समावेश आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस या चिनी नागरिकांची तस्करीत नेमकी काय भूमिका होती त्याचा सध्या तपास करीत आहे.
पोलिसांनी ज्या चिनी नागरिकांना अटक केली आहे त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
- ली च्यो चंग- वय ५५ वर्ष
- ल्यू वेंग चंग- वय ५१ वर्ष
- ल्यू व्होंग कोंग- वय ५३ वर्ष
हे तिघेही ‘अन व्हय व्हय व्हय बाई सै ,चीन’ चे रहिवासी आहेत. या तिघांशिवाय पोलिसांनी आफरोज शेख मोहम्मद (वय २९ वर्ष रा.बाजार चौक खापा) आणि देवेंद्र नगराळे (वय ३१ वर्ष रा.निमगाव ता. धानोरा जि. गडचिरोली) या दोघांनाही अटक केली आहे. हे दोघे जण गुमगाव माईल माईन्स येथील कर्मचारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अटकेतील चिनी नागरीक चायना कोल चे कर्मचारी असून, सध्या चायना कोल इंडिया प्रा.लि.साठी काम करीत आहेत. हिंदुस्थान आणि चीन या देशातील संयुक्त करारातंर्गत ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीचे सध्या गुमगाव इथे काम सुरू असून चिनी नागरीक तिथे टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत.
18 जानेवारी रोजी दरम्यान खापा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका गाडीची तपासणी केली. यावेळी त्यांना गाडीमध्ये आठ ते दहा किलो मांस आढळून आले. हे मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, तपासणीमध्ये हे गोमांसच असल्याचं सिद्ध झालं होतं.
अधिक वाचा : नोकरीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांनी फसवणूक