नागपूर : जिल्ह्यात मागील ३० वर्षात सर्वात कमी ३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात २४ तासात २.२ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद नागपुरात झाली आहे.
येत्या ५ दिवसांत नागपूर तसेच विदर्भात शीत लहरीचा अंदाज प्रादेशिक हवामान खाते तसेच केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या तीव्र शीतलहरीचा परिणाम मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागातही होणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी गेल्या आठवड्यात विदर्भाला चांगलेच कापरे भरविले होते.
जिल्ह्यातील या वर्षीच्या थंडीने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहे. झपाट्याने कमी होणाऱ्या तापमानामुळे जनसामान्यांची तारांबळ उडत आहे. उबदार कपडे आणि शेकोट्या पेटवून नागरिक कडाक्याच्या थंडी पासून स्वतःचा बचाव करत आहेत.
अधिक वाचा : बेघरांना दिला मनपाने निवारा, ब्लँकेटचेही वाटप