नागपूर : घरी आलेल्या दोन नातेवाइकांनी २५ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना वाडी हद्दीत उघडकीस आली आहे. युवती गर्भवती राहिल्याने या नातेवाइकांचे कृत्य उघड झाले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर दोन्ही आरोपी गावाकडे पळून गेले.
व्यंकटेश पप्सलेटी (३२) रा. गरवाल, करनुल, तेलंगणा आणि रामू गोपाल बोई (२६) रा. सोलापूर रोड, उस्मानाबाद अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी मूळची तेलंगणाची रहिवासी आहे. कामाच्या शोधात तिचे आई-वडील २० वर्षांपूर्वी नागपुरात आले. हे कुटुंब वाडी परिसरात वास्तव्यास असून आई चहाची टपरी चालविते. तिच्या लहान बहिणीचे लग्न झाले आहे.
आरोपींपैकी व्यंकटेश हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ तर रामू भाचा आहे. दोघांचेही नेहमीच पीडितेकडे जाणे-येणे होते. तरुणी दुपारी एकटीच घरी राहत असल्याने आरोपींनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. एप्रिल २०१८ पासून हा प्रकार सुरू होता. तरुणीच्या आईने झाल्या प्रकाराची माहिती तेलंगणातील गावपंचायतला दिली. गावपंचायतीसमोर आरोपींनी बाळंतपणाचा खर्च करण्याची कबुली दिली. पण, पैसे मात्र दिले नाहीत. तरुणी सध्या आठ महिन्यांची गर्भवती असून आरोपींकडून मदत न मिळाल्याने आईने शुक्रवारी वाडी ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
अधिक वाचा : फेसबुक मित्राचे ब्लॅकमेलिंग: अश्लील व्हिडीओ तयार करून आठ लाख लुबाडले