नागपूर : अजनीत राहणाऱ्या एका २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. प्रतीक रविकुमार गोंडाणे (२४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. स्पर्धा परीक्षेत येत असलेल्या अपयशातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता प्राथमिक तपासांत व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रतीक हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो मामेभाऊ आणि मामेबहिणी सोबत अजनी हद्दीतील बेलतरोडी रोड, रामटेकेनगर येथील श्रीसाई अमार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या मामेभावाचे मनीषनगरात हॉटेल आहे. तो आपल्या मामेभावाला हॉटेलातसुद्धा मदत करायचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रतीक तयारी करीत होता. स्पर्धा परीक्षेत वारंवार येत असलेल्या अपयशाने तो खचून गेला होता. शेजाऱ्यांसोबत हसतमुखाने बोलत असला तरी तो भविष्याबाबत तणावात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
बुधवारी रात्री त्याची मामेबहीण गोंदिया वरून नागपूरला आली. रेल्वे स्थानकावर तो तिला घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने रात्री बाराच्या सुमारास आपल्या खोलीत जाऊन सीलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या सहायाने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी फिर्यादी अचल नीलेंद्र उईके (२४) यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
अधिक वाचा : पोलिसांना ‘मर्डर’ झाल्याचा फोन करून आत्महत्या