भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाल्याचं समोर आलंय. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झालीय.
देशातील वेगवेगळ्या राज्यांत ११ एप्रिलपर्यंत जवळपास १०.४ कोटी डोसपैंकी एकूण ४४.७८ लाखहून अधिक लसीचे डोस वाया गेले. राजस्थानात सर्वाधिक म्हणजेच ६,१०,५५१ डोस वाया गेले.
तर शून्य अपव्ययासह गोवा, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच मिझोरम ही राज्य या निर्देशांकात उत्तम कामगिरी करणारी राज्य ठरली आहेत.
कोणत्या राज्यात किती डोस वाया गेले?
– राजस्थान : ६,१०,५५१
– तामिळनाडू : ५,०४,७२४
– उत्तर प्रदेश : ४,९९,११५
– महाराष्ट्र : ३,५६,७२५
– गुजरात : ३.५६ लाख
– बिहार : ३,३७,७६९
– हरियाणा : २,४६,४६२
– कर्नाटक : २,१४,८४२ – तेलंगणा : १,६८,३०२
– पंजाब : १,५६,४२३
– छत्तीसगड : १.४५ लाख
– ओडिशा : १,४१,८११
– आंध्र प्रदेश : १,१७,७३३
– आसाम : १,२३,८१८
– दिल्ली : १.३५ लाख
– जम्मू-काश्मीर : ९०,६१९
– मध्य प्रदेश : ८१,५३५
– झारखंड : ६३,२३५
– उत्तराखंड : ५१,९५६
– त्रिपुरा : ४३,२९२
– मणिपूर : ११,१८४
– मेघालय : ७,६७३
– सिक्किम : ४,३१४
– नागालँड : ३,८४४
– लडाख : ३,९५७
– पुदुच्चेरी : ३,११५
लसीचा अपव्यय म्हणजे काय? लसीचा अपव्यय हा कोणत्याही मोठ्या लसीकरण मोहिमेतील साहजिक भाग आहे. किती लस वाया जाऊ शकते याचा अंदाज घेऊनच लस निर्मिती केली जाते. प्रत्येक लसीचा अपव्यय शिफारसीच्या मर्यादेत असणं गरजेचं आहे.
लसीच्या एका कुपीत (बाटलीत) १० डोस असतात. कुपी उघडल्यानंतर पुढच्या चार तासांत ही लस वापरात येणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसात आपल्याला किती कुपी उघडायच्या आहेत, हे वापरकर्त्यांना माहीत असायला हवं. दिवसाच्या शेवटी कुपी उघडली गेली तर केवळ एक किंवा दोन लाभार्थी असतील आणि त्यांना लस दिली गेली तर उर्वरित आठ डोस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उघडलेल्या कुपींची संख्या आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती यांचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी एक व्यक्तीही लसीकरण केंद्रात दाखल झाली आली तरी जोखीम घेऊन कुपी उघडावी लागते. त्यामुळे, उरलेली लसीच्या डोसचा अपव्ययात समावेश होतो.
लसीचा अपव्यय टाळता येणं शक्य आहे? लसीचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य नियोजनावर भर देणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवसाअखेरच्या शेवटच्या तासात जेवढे नागरिक लसीकरणासाठी येणार असतील तेवढ्यांचा अंदाज घेऊन मगच कुपी उघडणं योग्य ठरेल. उरलेल्या लोकांना सकाळी येऊन लस घ्यावी अन्यथा इतर डोस वाया जातील, याची कल्पना देण्याची गरज आहे. समजावून सांगितल्यानंतर नागरिकही यासाठी सहकार्य करतात आणि लसीचा अपव्यय टाळणं शक्य होतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.